ध्यास विश्वसार्ह बातमीचा

इतके नालायक सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात झाले नाही ; वडेट्टीवारांचा घणाघात !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारमध्ये शेतकरी, बेरोजगार, महिला सुरक्षेपासून ते कायदा-सुव्यवस्थेपर्यंत प्रत्येक मुद्द्यावर सरकार अपयशी ठरले असून, हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले आहे. त्यामुळे अशा सरकारच्या चहापानावर आम्ही बहिष्कार टाकतो, असा घणाघात काँग्रेसचे नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला.

विधानभवनाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी शेतकरी कर्जमाफी, हिंदी सक्ती, बेरोजगारी, कायदा-सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यांवर त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरले.

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते, आता मात्र समित्या बसवून वेळकाढूपणा सुरू आहे. ज्याच्या श्रमावर आपण पोट भरतो, त्या बळीराजालाच सरकारचे लोक ‘तुला अंगावर घालायला कपडे, चपला आम्ही दिल्या, अशा प्रकारची भाषा माजी मंत्री असलेल्या लोणीकरांकडून वापरण्यात आली. अशा मनोवृत्तीच्या विकृत मनोवृत्ती असणाऱ्या सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमाला जाणार नाही, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला.

महाराष्ट्रात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला. या शेतकऱ्यांचा प्रचंड नुकसान झाले. दोन वर्षांपासून शेतकऱ्याला एक रुपयाही सरकारकडून मिळालेला नाही. या नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानीचे पैसे त्याला मिळत नाहीत. अशा सरकारच्या चहा पाण्याला का जायचे आम्ही? असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी केला.

ते पुढे म्हणाले, यांना न महिलांचे संरक्षण करता येते, ना कायदा सुव्यवस्था हाताळता येते. कायदा सुव्यवस्था पूर्णतः उध्वस्त झाला आहे. रोज खून होत आहेत. बलात्कार होत आहेत. कायद्याचा, पोलिसांचा कोणताही धाक राहिला नाही. पोलिस महिला अधिकारी सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या पुढे सुरक्षित नाहीत. त्यांचाही विनयभंग केला जातो. किती हिम्मत या सगळ्यांची केली आहे. त्यामुळे सरकारच्या चहापानावर आम्ही बहिष्कार टाकायचं ठरवले आहे. इतके नालायक सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात झाले नाही .

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 3 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार दिसून आला. हे सरकार टक्केवारी आणि जिल्हे वाटण्यासाठी एकमेकांसाठी भांडण्यात मश्गुल झाले आहे. या तिघांची वाट्यावरून भांडण सुरू झाली आहेत. वाटा मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची मानसिकता त्यांची आहे. एकमेकांच्या खात्यावर, निधीवर ते डोळा ठेवत आहे. यांचा जनतेच्या कामाकडे डोळा नाही. अधिकाधिक निधी मिळवायचा. त्यातून आपली टक्केवारी काढायची. इथे कुठलाही काम पैसे दिल्याशिवाय होत नाही. निधी मिळवायचा असेल तरी टक्केवारी दाखवावी लागते, तरच निधी सोडला जातो. असा आरोपही वडेट्टीवारांनी केला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!