मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात राजकीय घटनांनी वेग घेतला असून येत्या दोन दिवसात सर्वच पक्षाचे उमेदवार निश्चित होत असतांना अजून देखील महाविकास आघाडी व महायुतीच्या मुख्यमंत्री पदाची नावे निश्चित झाले नसल्याचे समोर आले आहे. महायुतीचे नेते देवेद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठे वक्तव्य केल्याने महायुतीमध्ये खळबळ उडाली आहे.
महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असा अपेक्षित प्रश्न संयुक्त पत्रकार परिषदेत आला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, चेहरा जाहीर करण्याची गरजच नाही, मुख्यमंत्री स्वतःच इथेच बसलेले आहेत !
हे उत्तर देताना फडणवीस यांनी उपस्थित नेत्यांपैकी कुणाकडेही पाहिले नाही किंवा कुणाचे नावही घेतले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बाजूलाच बसलेले असताना फडणवीस म्हणाले, महायुतीला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याची गरजच नाही. या क्षणी आमचे मुख्यमंत्री इथेच बसलेले आहेत. मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करून दाखवा असे आव्हान मात्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला दिले. महाविकास आघाडी आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करत नाही कारण हा उमेदवार निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावर बसेलच याची महाविकास आघाडीलाच खात्री नाही.
माझे शरद पवारांना खुले आव्हान आहे त्यांनी त्यांचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा. फडणवीस यांच्या सुरात सुर मिसळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याचे आव्हान शरद पवारांना दिले. मुख्यमंत्री म्हणाले, शरद पवारांना माहीत आहे की त्यांचा मुख्यमंत्री होणार नाही. त्यांनी आता विरोधी पक्षनेत्याचा चेहरा ठरवावा! आमच्याकडे कोणालाही मुख्यमंत्रिपदाचे डोहाळे लागलेले नाहीत. आमचे सव्वादोन वर्षाचे काम हाच आमचा चेहरा आहे, आम्ही तिघेही मजबूत आहोत !