मुंबई ,दि.: राज्यात महिला सुरक्षेविषयी एक चळवळ उभी राहावी, सुरक्षा उपायांबाबत समाजात जनजागृती व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ‘आदिशक्ती’ या अभिनव अभियानाचा शुभारंभ काल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
देशात डिसेंबर २०१२ मध्ये निर्भया प्रकरण घडलं. सार्वजनिक ठिकाणी अत्यंत क्रूर आणि हिंसात्मक पद्धतीने घडलेल्या या घटनेने संपूर्ण देश हादरला. या घटनेला आज ९ वर्ष पूर्ण होत असताना यानिमित्ताने महिलांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अशा उपक्रमाची गरज असल्याचे गृहमंत्र्यांनी उद्धृत केले.
जग जसे जसे पुढे चालले आहे, तसे तसे समाज महिलांबाबत सजग होत आहे. आपण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वावरत आहोत. स्त्रियांचा निरनिराळ्या क्षेत्रातील सहभाग देखील वाढत आहे. समाजातील जागरूकता वाढत असून ही जमेची बाजू असल्याचे गृहमंत्री म्हणाले.
मात्र दुसऱ्या बाजूला महिलांवर अत्याचाराच्या घटना देखील वाढत आहेत. ही आपल्यासाठी चिंतेची बाब आहे. महिलांना कुटुंब आणि कामाच्या ठिकाणी अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे. अशिक्षित भारतात देखील अत्याचाराचे एवढे प्रमाण नव्हते.
व्यवस्थेमध्ये काय दोष आहे, हे देखील पाहण्याची आता वेळ आली आहे. समाजाची प्रतिष्ठा ही महिलांच्या सुरक्षेवर अवलंबून असते. ज्या समाजातील महिला-मुली सुरक्षित नाहीत, तो समाज प्रगती करु शकत नाही.
समाजाने महिलांना सुरक्षा कवच दिले पाहिजे. यासाठी महिला आयोगाची स्थापना तसेच महिलांना निर्णय प्रक्रीयेत स्थान द्यावे लागेल. स्थानिक स्वराज संस्थामध्ये आपण महिलांना ५०% आरक्षण दिले. एक मुलगी आपल्या गावासहीत देशाचा, जगाचा कारभार चालवू शकते याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत.
गृहमंत्र्यांनी पुढे सांगितले की, “पहिले व एकुलते अपत्य असलेली आमची कन्या हीच आमची परंपरा व सामाजिक वसा पुढे नेईल हा दृढ विश्वास आहे. तिलाही सामाजिक काम करताना आनंद मिळतो, ही समाधानाची बाब आहे.”
महाराष्ट्र शासन मुली आणि महिलांच्या विकासासाठी कटिबद्ध असून महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला ‘शक्ती’ कायदा विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात मंजूर केला जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.