नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनेक भागात पावसाचा अंदाज वाढत असतांना अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून आता जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील कंगन भागात शनिवारी 3 ऑगस्ट रात्री ढगफुटी झाली. ढगफुटीमुळे अचानक पूर आला. यामध्ये अनेक घरांचे व वाहनांचे नुकसान झाले आहे. अनेक वाहने ढिगाऱ्याखाली दबली आहेत. श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्ग बंद आहे.
राष्ट्रीय महामार्ग बंद झाल्यामुळे काश्मीर खोरे लडाख या केंद्रशासित प्रदेशापासून तुटले आहे. अमरनाथ यात्रेसाठी बालटाल बेस कॅम्पचा रस्ताही बंद करण्यात आला आहे. कवचारवन, चेरवा आणि पडबळ या गावांना सर्वाधिक फटका बसला आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
हिमाचल प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून ढगफुटीच्या अनेक घटनांमुळे 114 रस्ते बंद करण्यात आले आहेत. हवामान खात्याने 7 ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून, यलो अलर्ट जारी केला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जून ते १ ऑगस्ट दरम्यान पाऊस, पूर आणि भूस्खलनात ७९ जणांचा मृत्यू झाला आहे.
कुल्लू, मंडी आणि शिमला येथे अनेक वेळा ढग फुटले. रामपूरमध्ये ३१ जुलैच्या रात्री ९ जणांचा मृत्यू झाला होता. 45 जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. 410 बचाव कर्मचारी बचाव कार्यात गुंतले आहेत. लोकांचा शोध घेण्यासाठी ड्रोनचीही मदत घेतली जात आहे. हिमाचल सरकारचे मंत्री विक्रमादित्य यांनी सांगितले की, ढगफुटीच्या घटनांमध्ये 50 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याची पुष्टी झालेली नाही. बचावकार्य सुरू आहे, मृतदेहांचा शोध सुरू आहे.