पुणे वृत्तसंस्था : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात जोरदार शब्दयुद्ध रंगले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणेकरांसाठी जाहीर करण्यात आलेल्या *मोफत मेट्रो* सेवेच्या घोषणेवर फडणवीसांनी टीका केल्यानंतर, सुप्रिया सुळेंनी त्यांच्या वक्तव्याला खोचक शैलीत प्रत्युत्तर दिले आहे.
“प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकण्याचा अनुभव ज्यांना असेल, त्यांनाच अशा मोफत घोषणांचं ज्ञान असणार,” असा टोला लगावत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांच्या टीकेला पलटवार केला. केवळ शब्दांपेक्षा प्रत्यक्ष काम महत्त्वाचं असून, राष्ट्रवादी काँग्रेसने विकासकामांतून ते सिद्ध केल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांमधील आरोप-प्रत्यारोप अधिकच तीव्र झाले आहेत.
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर राजकीय हालचालींना वेग आला असून पुणे महापालिका निवडणूक केंद्रस्थानी आली आहे. विशेष म्हणजे राज्यात सत्तेत सहभागी असलेले पक्षच या निवडणुकीत वेगवेगळ्या आघाड्यांमधून लढत असल्याने, महायुतीतील घटक पक्षांमध्येच वादाचे सूर उमटत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांसाठी मेट्रो सेवा मोफत करण्याची घोषणा केल्यानंतर ही राजकीय लढाई आणखी तापली आहे.
या घोषणेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट टीका करत जाहीरनाम्याची खिल्ली उडवली. पुण्यातील एका कार्यक्रमात ते म्हणाले, “मोफत मेट्रोची घोषणा ऐकून मलाही एक कल्पना सुचली. पुण्यातून उडणाऱ्या सर्व विमानांमध्ये महिलांना मोफत तिकीट दिलं पाहिजे. अनाउन्स करायला काय जातंय? अनाउन्स करायला आपल्या बापाचं काय जातंय?” असे म्हणत त्यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला. केवळ घोषणा करणं सोपं असतं, मात्र त्या प्रत्यक्षात शक्य आहेत का, याचा विचार व्हायला हवा, असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, सुप्रिया सुळेंच्या प्रत्युत्तरामुळे पुणे महापालिका निवडणुकीतील प्रचार आणखी आक्रमक होण्याची चिन्हे दिसत असून, सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर येत आहे.