मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील हिंदी व मराठी भाषेवरून वाद सुरु असतान आता भाजपचे नेते व सरकारचे मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे बंधूवर टीकास्त्र सोडले आहे. मुंबईचा डीएनए हिंदूंचा आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत केवळ भगवेच बसतील, असा दावा भाजपचे वादग्रस्त नेते तथा राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठे राजकारण होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळालेत.
नीतेश राणे यांच्या हस्ते शुक्रवारी ‘बोरीवली रो-रो जेट्टी (फेज 1)’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. यामुळे यापूर्वी दीड तासांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत पूर्ण होणार आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना नीतेश राणे म्हणाले, भाजप सरकारने घोषणा केलेली सर्व कामे आता पूर्ण होत आहेत. बोरीवली रो – रो बोट सेवेत गाड्यांसह प्रवाशीही प्रवास करू शकतात. त्यामुळे यापूर्वी ज्या प्रवासाला 1 तास 30 मिनिटे लागत होती, त्या प्रवासाला आता केवळ 15 मिनिटे लागतील. या पर्कल्पाचे भूमिपूजन महायुती सरकारच्या काळात झाले होते. त्याचे उद्घाटनही आता महायुती सरकारच्याच काळात होत आहे.
यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेतही महायुतीचीच सत्ता येणार असल्याचाही दावा केला. ते म्हणाले, मला गोल टोप्या घातलेल्या व दाढी असलेल्या लोकांनी मतदान केले नाही. मला हिंदूंनी मतदान केले. त्यामुळे मी आमदार झालो. परिणामी, मी हिंदूंची नाही तर उर्दू लोकांची बाजू घेईन का? आज लोकांनी हिंदू म्हणून एकत्र येण्याची गरज आहे. मुंबईचा डीएनए हिंदूंचा आहे. त्यामुळे महापालिकेत केवळ भगवे लोकच बसणार आहेत.
नीतेश राणे यांनी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व मनसेच्या संभाव्य युतीसह खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. संजय राऊत यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी जनतेचा दबाव असल्याचे म्हटले आहे. पण मातोश्री व कलानगरची जनता आमच्यासोबत आहेत. महाराष्ट्राच्या जनेतने 10 महिन्यांपूर्वीच आम्हाला निवडून दिले. आम्हाला काही पाकिस्तानच्या जनतेने निवडून दिले नाही. मग त्यांच्यावर कोणता दबाव आहे माहिती नाही, असे ते म्हणाले.
राज ठाकरे यांचे मराठीवर एवढे प्रेम असेल तर त्यांनी उद्याची अजाण मराठीत सुरू करावी. सर्वच मदरशातील उर्दू बंद करून तिथे मराठीची सक्ती करावी. त्यांनी तुम्ही मराठी व महाराष्ट्रावर प्रेम करणारे आहात हे आम्हाला कळेल, असेही ते यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले. पंढरपूर येथील सुरक्षा रक्षकाने काही भाविकांवर हात उगारला होता. या घटनेवर भाष्य करताना नीतेश राणे यांनी भाविकांवर हात उगारणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला.
दरम्यान, नीतेश राणे यांनी यावेळी छांगूर बाबा धर्मांतर प्रकरणावरही भाष्य केले. छांगूर बाबांचा निपटारा करण्यासाठी उत्तर प्रदेशात आमचे योगीजी पुरेसे आहेत. त्या बाबाचे महाराष्ट्रात चेले असतील, तर ते आमच्यावर सोडून द्या. त्यांना मातीत मिसळण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, असे ते म्हणाले.