पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अमोल मिटकरी व ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यात वाद सुरू असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असून आता अमोल मिटकरी यांनी लक्ष्मण हाके यांना एखादा झाकणझुल्या पुरस्कार देण्याची शिफारस करणार असल्याचे खोचक ट्विट केले आहे. त्यामुळे आता पुन्हा दोघांमध्ये वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. अमोल मिटकरी यांनी हे ट्विट करताना एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे, ज्यात लक्ष्मण हाके यांच्याकडे काम करणाऱ्या चालकाचा पगारही दिला नसल्याचे चालकाने म्हटले आहे.
अमोल मिटकरी यांनी ट्विट करत म्हटले की, त्याला YZ उपमा योग्यच होती. जो स्वजातीच्या ओबीसी बांधवांवर अन्याय करून ड्रायव्हरकीचा पगार देऊ शकत नाही तो फॉर्च्यूनर गाडी लोकांनी दिली ही कोण्या तोंडाने म्हणू शकतो? असे फक्त झाकणझुल्याच करू शकतो. याला एखाद्या झाकणझुल्या पुरस्कार 2025 देण्याची शिफारस मी करत आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.
काही दिवसांपूर्वी लक्ष्मण हाके यांना समाजाने फॉर्च्यूनर दिल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यावरून अमोल मिटकरी यांनी टीका केली होती. त्याला पुन्हा लक्ष्मण हाकेंनी प्रत्युत्तर दिले होते. आता मिटकरींनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात लक्ष्मण हाके यांच्या चालकानेच हाकेंवर गंभीर आरोप केले आहेत.
व्हिडिओमध्ये लक्ष्मण हाके यांच्याकडे काम चालकाचे काम करणाऱ्या व्यक्तीने म्हटले की, गेली 5 वर्षे मी हाके सरांकडे काम करत आहे. मागची तीन वर्षे हाके सर समाजाचे आहेत म्हणून त्यांच्याकडे पगार मागितला नाही. परंतु नंतर काम सोडत असताना हाके सर मला म्हणाले की पगार देतो, असे सांगून मला वापरुन घेतले आणि माझ्या पत्नीला जॉबला लावतो असे सांगून सुद्धा त्यांनी माझा वापर करून घेतला, असा आरोप या चालकाने केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, हाके सर समाजासाठी काम करतात म्हणून मी तीन वर्षे फुकट काम केले आहे. नंतर माझा मुलगा आजारी असताना माझेच पैसे मी त्यांना मागितले, त्यांना कॉल केले, त्यांनी कॉल उचलले नाहीत. मी त्यांना मेसेज केला की माझा मुलगा आजारी आहे मला पैसे लागत आहेत. नंतर हाके सरांनी माझ्या भावाला कॉल करून धमकी दिली. माझ्या बायकोचे शिक्षण इंजिनीअरिंग झाले आहे आणि कुठे पण जॉब लाऊन देऊ शकतो असे सांगितले होते, पण नाही लाऊन दिले. यानंतर लक्ष्मण हाके यांनी या चालकाला कोर्टात जा असे सांगितले होते, यावर बोलताना या चालकाने म्हटले की, कोर्टात जायची ऐपत असती तर पैसे कशाला मागितले असते, माझा पगार मागितला असता का मी? मी तिकडेच कोर्टात गेलो असतो न. तसेच अमोल मिटकरी मला न्याय देतील, नक्की न्याय देतील आणि पैसे नाही मिळाले तर आंदोलन करेल मी. मी माझे बायका पोरं घेऊन मंत्रालयासमोर उपोषण करणार आहे, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.