सोलापूर : प्रातिनिधी
शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी भरदिवसा घरफोड्या करणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (दि.१७) अटक केली. त्याच्याकडून १४ लाख ३९ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमन फैयाज शेख (वय 19 रा. कसाईवाडा, कोहिनूर सिटी, आग्रा रोड, कुर्ला वेस्ट मुंबई, सध्या रा. नई जिंदगी) असे या चोरट्याचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील जोडभावी पेठ परिसरातील तक्रारदार सुरेखा विठ्ठल तोडकरी (वय ५२, शिक्षिका) यांच्या घरातून सुमारे १७७.७ ग्रॅम वजनाचे दागिने, रोख रक्कम २३ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला होता. तसेच दुसर्या घटनेत तेलंगी पाछा पेठ येथील अपार्टमेंटमधून तक्रारदार फराह रशीद शेख (वय ५१, व्यवसाय शिक्षिका, रा.शाब्दी अपार्टमेंट) यांच्या घरातून सुमारे ३५.५ ग्रॅम वजनाचे दागिने, रोख रक्कम दहा हजार रुपयांची चोरी झाली होती. दोन्ही गुन्हे भर दिवसा घडल्याने गुन्हे शाखेचे सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळी भेट दिली.
त्यानंतर गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक खेडकर यांच्या तपास पथकातील पोलीस कॉन्स्टेबल इम्रान जमादार यांनी बारकाईने निरीक्षण करून तसेच तांत्रिक पुरवण्याच्या साह्याने चोरी करणार्या संशयित आरोपीला अधोरेखित केले. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकातील अंमलदार यांना चोरट्याबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार संशयित आरोपी अमन शेख याला सापळा लावून अंत्रोळीकर नगर ते कुमठा नाका दरम्यान क्रीडा संकुल येथील पोस्ट ऑफिस जवळून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून एकूण १४ लाख ३९ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. दीपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकातील पोलिस अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, बाळासाहेब काळे यांनी केली.