ध्यास विश्वसार्ह बातमीचा

माजी मंत्री खडसेंच्या बंगल्यावर चोरट्यांनी मारला डल्ला !

जळगाव : वृत्तसंस्था

राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील निवासस्थानी मोठी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. खडसे सध्या मुक्ताईनगर येथील घरी वास्तव्यास असल्याने जळगावमधील त्यांचा बंगला काही दिवसांपासून बंद होता. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेमुळे जळगाव पोलिस दलाच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चोरी झाल्यानंतर घटनास्थळी स्थानिक पोलिसांनी पाहणी केली असून, फॉरेन्सिक पथकाला देखील तपासासाठी बोलावण्यात आले आहे. चोरट्यांनी बंगल्यातील अनेक कपाटे उघडल्याचे आणि घरात सर्व वस्तू उलथापालथ केल्याचे दिसून आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, चोरीत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने मिळून काही लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. मात्र, अद्याप आरोपींचा माग काढण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

या घटनेनंतर एकनाथ खडसे यांनी जळगाव पोलिसांवर निशाणा साधला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जळगाव जिल्ह्यात पोलिसांचा धाक उरलेलाच नाही. चोऱ्या आणि दरोडेखोरांच्या घटना वाढल्या आहेत, पण पोलिसांना त्याचं काहीच वाटत नाही. हे सगळे पोलिस हफ्ते घेण्यात मश्गूल आहेत. कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. त्यांनी पुढे संतप्त स्वरात म्हटले की, मी पोलिसांच्या कामावर टीका केली की स्थानिक आमदार माझी टिंगलटवाळी करतात. पण वास्तव असं आहे की, सामान्य नागरिक असुरक्षित आहेत आणि कुणालाही याचं गांभीर्य उरलेलं नाही.

दरम्यान, खडसे कुटुंबीयांच्या मालकीच्या मुक्ताईनगर येथील रक्षा ऑटो फ्युअल या पेट्रोल पंपावर देखील काही दिवसांपूर्वी दरोड्याची घटना घडली होती. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या या पेट्रोल पंपावर 10 ऑक्टोबरच्या रात्री दोन दुचाकींवरून आलेल्या पाच दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवला. त्यांनी दोघांना बेदम मारहाण करत एका कर्मचाऱ्याच्या डोक्याला बंदूक लावली आणि सुमारे एक लाख रुपयांची रोकड घेऊन पसार झाले होते. या घटनेनंतरही स्थानिक पोलिसांना दरोडेखोरांचा माग काढण्यात यश आलेले नाही.

अल्पावधीतच खडसे कुटुंबीयांच्या दोन मालमत्तांवर झालेल्या या सलग गुन्ह्यांनी जळगाव आणि मुक्ताईनगर परिसरातील सुरक्षेचा प्रश्न गंभीर स्वरूपात पुढे आणला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस प्रशासनावरील विश्वास डळमळीत झाला आहे. आता पोलिसांनी तपासात गती देऊन आरोपींना अटक केली नाही, तर हे प्रकरण आणखी राजकीय रंग घेण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे यांनी सरकार आणि पोलिस प्रशासनाला इशारा देत सांगितले की, हे असं सुरू राहिलं तर नागरिक स्वतःच न्याय शोधायला लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!