मारुती बावडे
अक्कलकोट, दि.७ : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावाजवळील हिरोळी बॉर्डर जवळ कर्नाटकातून येणाऱ्या वाहनधारकांची तसेच प्रवाशांचे कसून तपासणी सुरू आहे. या तपासणी नाक्याला आज अचानकपणे महसूल आणि पोलिस विभागाने भेट देत कामाची पाहणी केली. यात हयगय चालणार नाही. कर्नाटकातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कसून तपासणी सुरू आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली.
कर्नाटकातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक आहे त्याचबरोबर दोन्ही कोरोना लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. त्याशिवाय महाराष्ट्रात प्रवेश दिला जाणार नाही, अशा स्पष्ट सूचना या पथकाला दिले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांनी या सर्व कामाची माहिती घेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशाचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन संबंधित अधिकार्यांना केले. महसूल प्रशासनही या बाबतीत दक्ष असून संबंधितांना ह्या बाबतीत अलर्ट करण्यात आले आहे. वरून येणाऱ्या प्रत्येक आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत आहे, अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांनी दिली.
या पाहणी दरम्यान गटविकास अधिकारी बी.डी ऐवळे हेही उपस्थित होते. त्यांनीही संबंधितांना नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची सूचना केली.हिरोळी बॉर्डरवर नियुक्त करण्यात आलेल्या पथकामध्ये आरोग्य विभागाचे तीन कर्मचारी तसेच पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या बॉर्डरवरून महाराष्ट्रात ज्या ठिकाणी प्रवेश होतो त्याच ठिकाणी हा तपासणी नाका सुरू करण्यात आला आहे. ओमिक्रोन या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व पातळीवर खबरदारी घेण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अक्कलकोट तालुक्यात दोन ठिकाणी तपासणी नाके सुरू केले आहेत.