मुंबई, नागपूर प्रतिनिधी : राज्यातील न्यायव्यवस्थेला हादरवून सोडणारी गंभीर घटना गुरुवारी समोर आली. मुंबई उच्च न्यायालयासह वांद्रे, किल्ला कोर्ट आणि राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली. या धमकीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली असून, पोलिस व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
मुंबई पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर धमकीचा संदेश प्राप्त झाला. या मेलमध्ये मुंबईतील सर्व न्यायालये बॉम्बने उडवून देण्याचा उल्लेख करण्यात आला असून, वांद्रे आणि किल्ला न्यायालयांची नावे स्पष्टपणे नमूद करण्यात आली होती. धमकीची तीव्रता लक्षात घेता दुपारी एकच्या सुमारास मुंबई उच्च न्यायालयाची इमारत तातडीने रिकामी करण्यात आली. वकील, कर्मचारी आणि पक्षकारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. वांद्रे न्यायालयातही कामकाज थांबवून संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला. याचदरम्यान अंधेरी न्यायालयालाही बॉम्ब धमकी मिळाल्याने तेथील परिसर सील करून तपास सुरू करण्यात आला.
न्यायालय परिसरात बॉम्बशोधक व नाशक पथक (BDDS), श्वान पथक आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी दाखल झाले असून, प्रत्येक कोपऱ्याची कसून तपासणी सुरू आहे. सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालय परिसरात कोणालाही प्रवेश किंवा बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.
मुंबईप्रमाणेच नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयालाही सकाळी धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. या मेलमध्ये सिव्हिल लाईन्स परिसरातील न्यायालयात दोन आरडीएक्स आधारित स्फोटके पेरल्याचा दावा करण्यात आला होता. नागपूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष रोशन बागडे यांनी याबाबत माहिती देताच नागपूर पोलिसांनी तातडीने संपूर्ण न्यायालय परिसर रिकामा करून सुरक्षा वाढवली. सध्या तेथेही सखोल तपासणी सुरू असून अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही.
या धमकीमागे नेमका कोण आहे, त्याचा उद्देश काय, याचा शोध घेण्यासाठी मुंबई आणि नागपूर सायबर पोलिसांची स्वतंत्र पथके कार्यरत झाली आहेत. धमकीचा ई-मेल पाठवणाऱ्याचा आयपी ॲड्रेस ट्रॅक करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, गंभीर गुन्हा म्हणून या प्रकरणाची नोंद करण्यात येत आहे. दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वी मिरा रोड येथील एका खासगी शाळेलाही अशाच स्वरूपाची बॉम्ब धमकी देण्यात आली होती. त्यावेळीही तपासणीनंतर कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नव्हती. दिल्लीतील कार स्फोटाच्या घटनेनंतर देशातील विविध ठिकाणी अशा धमक्या वाढल्याचे चित्र आहे.
नागरिकांनी, वकिलांनी आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी घाबरून न जाता पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. न्यायालयांना लक्ष्य करून दिलेल्या या धमकीमुळे राज्यातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.