ध्यास विश्वसार्ह बातमीचा

थरारक : पाणीपुरीत विष मिसळून गरोदर प्रेयसीला मारण्याचा प्रयत्न; प्रियकराला अटक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

पाणीपुरीच्या माध्यमातून गरोदर प्रेयसीची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना झारखंडमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली असून सुदैवाने पीडितेचा जीव वाचला आहे.

ही घटना झारखंड राज्यातील गढवा जिल्हा येथील रामकांडा पोलीस ठाणे परिसरात घडली. करण (बदलेलं नाव) आणि सिमरन (बदलेलं नाव) हे गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. लग्नाचे आमिष दाखवून करणने सिमरनसोबत संबंध ठेवले होते. या संबंधातून त्यांना एक मूलही झाले होते. मात्र गावात चर्चा वाढल्याने दोघे काही काळ वेगळे राहू लागले.

काही महिन्यांनंतर करण पुन्हा सिमरनच्या संपर्कात आला. त्यानंतरच्या संबंधातून सिमरन आठ महिन्यांची गरोदर राहिली. तिने लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केल्याने दोघांमध्ये वाद वाढू लागले. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, या पार्श्वभूमीवर करणने तिला संपवण्याचा कट रचला.

सिमरनला पाणीपुरी आवडत असल्याचे माहित असल्याने करणने तिला पाणीपुरी आणून दिली. मात्र त्यामध्ये विष मिसळल्याचा आरोप आहे. पाणीपुरी खाल्ल्यानंतर सिमरनला उलट्या आणि अस्वस्थता जाणवू लागली. प्रकृती बिघडत असल्याने तिने करणकडे डॉक्टरांकडे नेण्याची विनंती केली. मात्र रुग्णालयात न नेता आरोपी तिला जंगलात घेऊन गेला आणि तिच्यावर हल्ला करून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पीडितेने प्रसंगावधान राखत तेथून पळ काढला आणि थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!