मारुती बावडे
अक्कलकोट, दि.१ : दिवाळीतील सलग सुट्ट्यांमुळे अक्कलकोट शहरातील वाहतुकीचे नियोजनाचे तीन तेरा झाले असून प्रचंड वाहतुकीच्या कोंडीमुळे भाविक अक्षर:शा वैतागले आहेत. संबंधित प्रशासनाचे यावर नियंत्रण नसल्याने अक्कलकोटमध्ये व्यवस्था नावाची गोष्ट आहे की नाही, याबाबत चर्चा सुरू आहे. इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची ट्रॅफिक जाम झाल्याने सर्व नियोजनच हाताबाहेर गेले आहे. याबाबत भाविकांमधून मात्र संतापाची लाट उसळली आहे.
अक्कलकोट शहरातील रस्ते आधीच अरुंद त्यात वाहतुकीचे नियोजन अजिबात नाही, अशा दुहेरी संकटात परगावचे भाविक मात्र अडकून पडले आहेत. या ठिकाणी वाहतुकीची समस्या तर मोठी आहेच पण मुताऱ्या आणि स्वच्छतागृहांचाही फार मोठा प्रश्न आहे. याचा अभाव असल्याने भाविकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. वर्षानु वर्षांपासून हा प्रश्न तसाच आहे. अक्कलकोट नगरपालिका ब दर्जाची असतानाही आत्तापर्यंत या समस्या का सुटल्या नाहीत, असा प्रश्न विचारण्याची
वेळ भाविकांवर आली आहे.
राज्यातील अन्य तीर्थक्षेत्रांची शहरे आणि तेथील सुविधा पाहता अक्कलकोट कोसोदुर असल्याची चर्चाही भाविकांमध्ये सुरू झाली आहे. अक्कलकोट शहरात भरमसाठ लॉजिंग झाले आहेत पण अपवाद वगळता पार्किंगची व्यवस्थाच नाही, ही देखील लाजिरवाणी बाब आहे आणि हे सर्व असताना परवानग्या कशा मिळतात हा देखील संशोधनाचा विषय आहे. याकडे पोलीस लक्ष देत नाहीत का? असाही विषय समोर येत आहे.
दर दोन-तीन महिन्याला दोन ते चार लॉज अक्कलकोटमध्ये होत आहेत.फत्तेसिंह चौक, अन्नछत्र मंडळाच्या बाहेर, मंदिर परिसर, ए- वन चौक, प्रियदर्शिनी सभागृह परिसर, बायपास रोड चौक, बासलेगाव रोड,मैंदर्गी रोड आदी ठिकाणी वाहने रस्त्याच्या कडेला लावली जात आहेत. शहरातील ही सगळी ठिकाणे अनधिकृत आहेत. तरी ठिकठिकाणी गाड्या उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला जात आहे. एकही प्रशासनाकडून अधिकृत मोठे पार्किंग नसल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. गर्दीसंबंधी कोणतेही नियोजन प्रशासनाकडे नाही मंदिर परिसरातील अतिक्रमणे त्याला कारणीभूत आहेत. येत्या काळात आणखी काही सुट्ट्या येणार आहेत. त्यामुळे भाविकांची गर्दी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. अशा वेळी भक्तांची काळजी घेणे गरजेचे आहे.
सध्या घडीला तरी कोणीही गंभीरपणे लक्ष घालताना दिसत नाही. सध्या शहरात जागा दिसेल त्या ठिकाणी रस्त्यावर गाड्या लावल्या जात आहेत. वन वे तर नुसते नावालाच आहे. पोलिस प्रशासन वाहतूक विभागाचे नीट नियोजन करत नाही, नगरपरिषदेला तर याचे काही देणे घेणे नाही. यामुळे या आठवड्यात तर भयंकर त्रास सोसावा लागला आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे. खरे तर या त्रासाची दखल घेऊन नगरपरिषद व वाहतूक व्यवस्था विभाग यांनी सुयोग्य नियोजन करून वाहन पार्किंग तसेच स्वामी दर्शन सुलभ व्हावे यासाठी योग्य ते नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.
….तर पुन्हा डोकेदुखी वाढणार !
प्रत्येक लॉजमालक आपआपल्या ग्राहकांना पार्किंग सेवा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था तर कुठेच नाही. वाहनतळांची व्यवस्था केली, तरच शहरातील वाहतूक व्यवस्था येत्या काळात सुधारणार आहे. अन्यथा पुन्हा पुन्हा वाहतुक व्यवस्थेच्या कोंडीची डोकेदुखी प्रशासनासमोर राहणार आहे हे लक्षात घ्यावे लागेल.