ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मराठी शाळेच्या आठवणी जागवणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चा ट्रेलर प्रदर्शित

अलिबाग प्रतिनिधी : मराठी शाळांच्या अस्तित्वावर हलक्याफुलक्या पण परिणामकारक पद्धतीने भाष्य करणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. विशेष बाब म्हणजे, या चित्रपटाचे चित्रीकरण ज्या अलिबागमधील नागाव येथील शाळेत झाले, त्याच शाळेच्या चौकात ट्रेलर अनावरणाचा सोहळा पार पडला. कधी वर्गखोल्यांत घुमणारे आवाज, बाकांवर कोरलेली नावं, फळ्यावर उमटलेले धडे आणि मैदानात रंगलेली दंगा-मस्ती… या साऱ्यांचा साक्षीदार असलेला शाळेचा परिसर पुन्हा एकदा भावनांनी भारून गेला.

‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटात बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या एका मराठी शाळेची हृदयस्पर्शी कथा मांडण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे की, अनेक वर्षांनंतर त्या शाळेचे माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र येतात आणि आपल्या शाळेला वाचवण्यासाठी एकजुटीने लढा उभारतात. या पुनर्भेटीत त्यांच्या बालपणीच्या आठवणी, खोडकरपणा, मैत्री, शिक्षकांची शिस्त, शिक्षा, दंगा-मस्ती आणि निरागस क्षण पुन्हा जिवंत होतात.

हा ट्रेलर नॉस्टॅल्जियाने भरलेला असून, प्रेक्षकांच्या मनाला थेट भिडतो. मजेशीर आणि भावनिक क्षणांसोबतच तो आजच्या काळातील एक संवेदनशील वास्तव मांडतो. मराठी शाळा बंद पडण्याच्या पार्श्वभूमीवर, मनोरंजनाच्या माध्यमातून मराठी भाषा आणि मराठी शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न ठळकपणे दिसून येतो.

दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाले की, महाराष्ट्रात मराठी शाळांची संख्या कमी होत जाणं ही एक गंभीर वस्तुस्थिती आहे. त्या वास्तवाला भिडणारी, तरीही प्रेक्षकांना आपलीशी वाटेल अशी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. ज्या शाळेत चित्रीकरण झालं, तिथेच ट्रेलर प्रदर्शित करणं हा एक खास अनुभव ठरला असून, त्यामुळे चित्रीकरणाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्याचं त्यांनी सांगितलं. हा चित्रपट पाहताना प्रत्येकाला आपल्या शाळेच्या आठवणी नक्कीच येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

1 जानेवारी 2026 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत झळकणार असून, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर आणि मराठी चित्रपटात प्रथमच पदार्पण करणारी प्राजक्ता कोळी अशी दमदार कलाकारांची फौज दिसणार आहे. याशिवाय अभिनेत्री निर्मिती सावंतची भूमिका काय असणार, याबाबत ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढवली आहे.

मराठी शाळेच्या आठवणी, मैत्रीची ऊब आणि भाषेचा अभिमान यांचा सुरेख संगम असलेला ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ प्रेक्षकांच्या मनात घर करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!