बार्शी : प्रतिनिधी
शहर व तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. ऐन सणाच्या तोंडावर मोठे संकट शेतकऱ्यांसमोर उभा राहिले आहे. या पार्श्वभूमीवर बार्शी शहर व तालुक्यातील पारलिंगी समुदायाने गुरुवारी जोगवा मागून जमा झालेली रक्कम नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिली. तहसील कार्यालयात जाऊन निवासी नायब तहसीलदार संजीवन मुंढे यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यायत्ता निधीत चलन भरून रोख रक्कम सुपूर्द केली.
बार्शी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी फुलाची पाकळी म्हणून बार्शी शहर व तालुक्यातील पारलिंगी (तृतीयपंथी) समुदायाने सर्वात पुढे होत ही गुरुवारी ही मदत तहसील कार्यालय येथे जाऊन दिली. समाजाकडून आम्हाला खूप मिळाले आहे. आज शेतकरी संकटात आहे. आशा स्थितीत त्यांच्या पाठीशी आम्ही उभा आहोत, अशी भावना व्यक्त करत या पारलिंगींनी ही आर्थिक मदत दिली. पार लिंगी मार्गदर्शक सचिन वायकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम घेण्यात आला.
जवळ फारसे पैसे नाहीत, मात्र शेतकऱ्यांचे मनोबल वाढावे , या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांना बळ मिळावे हीच आमची भावना असल्याचे सांगत तालुक्यात सर्वात आधी या पारलिंगी समुदायाने हे पहिले पाऊल टाकले आहे.
पारलिंगी समुदायाकडून मानवतावादाचा विचार : वायकुळे
अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. याकाळात जगाचा पोशिंदा असणाऱ्या या शेतकऱ्यांकडून अन्नधान्य, भाजीपाला याचा पुरवठा होतो. या संकटाच्या काळात माणसाने माणसासम वागावे असे सांगत या पारलिंगी समुदायाने ‘ टाळी ‘ वाजवून दहा वीस रुपये मागून जमा झालेली ही जोगव्याची रक्कम आहे तशी या शेतकऱ्यांसाठी दिली. मानवतावादाचा विचार बार्शीतील सर्व पारलिंगी समुदायाने जपला आहे.
– सचिन वायकुळे
पारलिंगी मार्गदर्शक , बार्शी,
जि.सोलापूर