भिवंडी : वृत्तसंस्था
भाजपला घटना बदलायची आहे, म्हणून चारशेपेक्षा जास्त जागा पाहिजेत. डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाने दिलेले अधिकार त्यांना संकटात आणायचे आहेत. तसे झाले तर या देशात हुकूमशाही पाहावयास मिळेल. ते टाळण्यासाठी महाआघाडीला निवडून आणा, असे आवाहन राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक शरदचंद्र पवार यांनी भिवंडीतील सभेत केले.
या राज्यातील शेतकरी व कष्टकरी संकटात आहे. अल्पसंख्याकांची स्थिती बिकट आहे. त्यामुळे देशाची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांना रोखायला हवे, असेही ते म्हणाले. भिवंडीतील लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांची प्रचारसभा शुक्रवारी सायंकाळी भिवंडीतील पोगाव येथे आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते.. या प्रचार सभेसाठी राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार यांच्या सोबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, जयंत पाटील, संजय सिंग, भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख, खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, महेश तपासे तसेच स्थानिक पातळीवरील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष, उबाठा, काँग्रेस, आरपीआय सेक्युलर आणि इतर संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देवावर विश्वास असल्याने माझी तुरुंगातून सुटका झाल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाचेही आभार मानले. गरीबांना विविध सवलती दिल्या आणि त्यांच्यासाठी शाळा बांधल्या म्हणून मोदींनी मला तुरुंगात टाकले, असा आरोप त्यांनी केला.