ध्यास विश्वसार्ह बातमीचा

संतोष देशमुख हत्याकांडाला एक वर्ष ; ‘आरोपींना फाशीच हवी’: कुटुंबीयांचा न्यायाच्या लढ्याचा निर्धार कायम !

बीड : वृत्तसंस्था

संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या संतोष देशमुख हत्याकांडाला आज (२९ नोव्हेंबर) एक वर्ष पूर्ण झाले असले तरी देशमुख कुटुंबीयांचा न्यायासाठीचा संघर्ष अद्यापही सुरूच आहे. “आरोपींना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय शांतता आणि समाधान मिळणार नाही,” अशी ठाम भूमिका कुटुंबीय व मस्साजोग ग्रामस्थांनी व्यक्त केली. संतोष देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गावात कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

मृत संतोष यांचे भाऊ धनंजय देशमुख म्हणाले, “पहिल्या दिवसापासून सुरू केलेला न्यायाचा लढा अजूनही चालू आहे. क्रूरकर्म्यांना फाशीची शिक्षा व्हावी, हा आमचा एकमेव उद्देश आहे. माझ्या भावाचा खून करून आमचे कुटुंब उद्ध्वस्त केले; अशा आरोपींना क्षमाच नाही.”

या प्रकरणात अद्यापही वेळकाढूपणा होत असल्याचा आरोप करत धनंजय देशमुख म्हणाले, “चार्जफ्रेम करण्यास अनाठायी विलंब लावला जात आहे. मात्र १२ डिसेंबर रोजी आरोप निश्चित होणार आहेत. फरार कृष्णा आंधळेच्या तपासावर कोर्टाने नाराजी व्यक्त केली असून तपास यंत्रणांकडून गेल्या तीन महिन्यांचा तपासविवरण मागवले आहे. आमच्या आंदोलनांमुळे आरोपी ११ महिन्यांपासून तुरुंगात आहेत.”

ते पुढे म्हणाले, “हे प्रकरण लवकरात लवकर न्यायालयात चालावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री स्वतः यांनीही गुन्हेगारांना शिक्षा देण्याचे आश्वासन दिले आहे. आवश्यकता भासल्यास आम्ही गावकरी मिळून पुढील पाऊल उचलण्यासही तयार आहोत.”

धनंजय देशमुख यांनी भावाच्या आठवणी सांगताना भावनिक होत म्हटले, “भाऊ जिवंत असताना जी कामे करत होतो, ती आजही करतो. गावाची साथ आम्हाला खऱ्या अर्थाने बळ देते. लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, सर्व समाज आमच्या पाठीशी उभा आहे. मनोज जरांगे यांच्याशी आम्ही सतत संपर्कात असतो. आम्ही कधीही खचलो नाही, आणि खचणारही नाही.”

एक वर्षात कुटुंबीयांनी जलसंधारणाची कामे, रक्तदान शिबिरे आणि विविध सामाजिक उपक्रम राबवले. “मागच्या वर्षी प्रत्येक सण दुःखद आठवणी घेऊन यायचा. त्या आठवणी विसरू शकत नाही. पण समाजकार्य करण्याची इच्छाशक्ती आम्हाला गावानेच दिली,” असे ते म्हणाले. संतोष देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज समाधान महाराज शर्मा यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून गावात भावनिक वातावरण निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!