शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना उदयन रांजेनी दिला निर्वाणीचा इशारा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानासाठी लवकरच मुंबईतील आझाद मैदानात मोर्चा
रायगड : देशाला स्वराज्य, सर्वधर्म समभावाचाआदर्श विचार देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट, लिखाण व वक्तव्यांतून सातत्याने अवमान केला जात आहे. वर त्याचे समर्थन करण्याचे धाडसही दाखवले जात आहे. मात्र, आता शिवरायांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा खासदार उदयनराजे यांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानासाठी लवकरच मुंबईतील आझाद मैदानात मोर्चा काढला जाईल, अशी घोषणा शिवरायांचे वंशज व खासदार उदयनराजे भोसले यांनी आज रायगडावर केली. तत्पूर्वी, महाराष्ट्रात फिरून समाजातील सर्व लोकांच्या भेटीगाठी घेणार आहे, असेही उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केलं.
उदयनराजे म्हमाले, काही जणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्यानंतरही या विषयाला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन केले जात आहे. आणि आम्ही मुग गिळून पाहत बसलो आहोत. हीच आमची चूक झाली. राजेंचा अपमान झाला म्हणून आम्ही केवळ प्रतिक्रिया देत आहोत. आम्ही प्रतिक्रिया वादी झालो आहोत.
राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार व भाजपच्या काही नेत्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. उदयनराजे यांनी त्यांनाही अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं. ‘चूक ही चूकच असते. स्वत:च्या स्वार्थासाठी चुका करणाऱ्यांचं समर्थन करताना लाज वाटली पाहिजे, असं उदयनराजे म्हणाले.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, त्यानंतर राज्यातील भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राज्यपाल हे पुन्हा पुन्हा अशी वक्तव्यं करत असल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात अस्वस्थता आहे. राज्यपालांना हाकलण्याची मागणी शिवप्रेमी संघटनांनी केली आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून कुठलीही कारवाई होण्याऐवजी राज्यपालांच्या विधानावर सारवासारव केली जात आहे. त्यांना पाठीशी घातलं जात आहे. त्यामुळं शिवप्रेमींच्या अस्वस्थतेत भर पडली आहे. त्यामुळं स्वत: उदयनराजे मैदानात उतरले असून त्यांनी आज रायगडावर आक्रोश आंदोलन केलं.