ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात सुरु झाले महाविकास आघाडीचे निषेध आंदोलन

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच बदलापूर अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच घटनांचा निषेध करण्यासाठी मविआकडून सरकारविरोधात आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने हा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असल्याचे सांगत कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता विरोधकांनीही महाराष्ट्र बंद मागे घेतला आहे. मात्र महाविकास आघाडीकडून राज्यभरात ठिकठिकाणी निषेध आंदोलन सुरू आहे.

शिवसेना मध्यवर्ती कार्यलयाबाहेर काळ्या फिती लावून आंदोलन सुरू आहे. यात उद्धव ठाकरेंकडून भर पावसात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तर आंदोलनात आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत.

शरद पवार म्हणाले की, राज्यातील राज्यकर्ते प्रचंड असंवेदनशील आहेत. माझ्या परिसरात किंवा आसपास महिलेवर अत्याचार होत असेल तर त्यांच्या विरोधात आवाज उठवत महिलांचा आदर राखील. सुरक्षित शहरासाठी आम्ही प्रयत्न करू असे शरद पवारांनी म्हटले आहे. तर महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य आहे. त्यांच्या राज्यात अत्याचाराची घटना झाली तेव्हा त्यांनी चौरंग करण्याची शिक्षा दिली होती, असेही त्यांनी म्हटले.

संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना मदत करण्यासाठी आघाडीवर असतो त्यांच्या याचिकेवर कोर्टाने निर्णय दिला. यावेळी त्यांची प्रतिष्ठा काय, योगदान काय असा सवाल करत राऊतांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर निशाणा साधला आहे. हा काही राजकीय बंद नव्हता. पण हा बंद 100 टक्के यशस्वी झाला असता, याची सरकारला अडचण झाली असती, असा टोला राऊतांनी लगावला आहे. आम्ही कोर्टाचा आदेश मानतो, ती आमची परंपरा आहे. पण यापुढे जर अशा घटना घडल्या तर त्याला कोर्ट आणि याचिकाकर्ते जबाबदार असेल असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, आमचे हे संपूर्ण राज्यात निषेधाचं आंदोलन आहे. आम्ही बंद पुकारला होता पण तो रद्द केला असला तरी अनेक व्यापारी अनेक दुकानदारांनी बंद पाळला आहे. आम्ही सर्व मविआचे कार्यकर्ते काळ्या फिती लावून बसलो आहोत. हे काळ्या पायाचे सरकार आहे, असा टोला दानवेंनी छत्रपती संभाजीनगरात लगावला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!