ध्यास विश्वसार्ह बातमीचा

निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय : ज्येष्ठांना विश्रांती, तरुणाईला संधी !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील स्थानिक निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा शंखनाद होण्याच्या तयारीत असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता मोठ्या बदलाच्या दिशेने पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सेनेकडून या वेळी तरुण आणि नव्या चेहऱ्यांना उमेदवारीसाठी प्राधान्य दिलं जाणार आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये सतत पुनरावृत्ती होत असलेल्या माजी नगरसेवकांऐवजी या वेळेस पक्ष नव्या पिढीवर विश्वास ठेवणार आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नगरसेवकांना विश्रांती देऊन, नव्या पिढीला संधी देण्याचा निर्णय ठाकरेंनी घेतल्याचं सांगितलं जातं. हा निर्णय अमलात आल्यास पक्षात मोठ्या उलथापालथीचे वारे वाहू शकतात. ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता असली तरी उद्धव ठाकरे यांचा भर युवा नेतृत्वाचा विस्तार आणि नव्या उर्जेचं संघटन यावर असल्याचं दिसून येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नगरसेवकांना उमेदवारी नाकारताना पक्ष त्यांच्या कार्याचा आणि अनुभवाचा सन्मान राखणार आहे. ठाकरे गटाकडून विचार सुरु आहे की, ज्येष्ठ नगरसेवकांच्या मतांचा आदर राखून त्यांच्या पसंतीचा उमेदवार त्या वॉर्डांत उभा केला जाईल. यामुळे जुन्या आणि नव्या नेतृत्वामध्ये समतोल साधला जाईल. उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांच्या मते, आमचं उद्दिष्ट म्हणजे नव्या कार्यकर्त्यांना मैदानात उतरवणं, त्यांना लोकांशी जोडणं आणि पक्षाला नवचैतन्य देणे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीत ठाकरे गटाकडून सुमारे 70 टक्के नवे चेहरे मैदानात उतरणार आहेत. अशा प्रकारे, तरुणाईला अधिक संधी देत शिवसेना ठाकरे गट स्वतःचं नवउत्थान घडवण्याच्या तयारीत आहे.

यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सेनेकडून मुंबईतील प्रत्येक वॉर्डाचा तपशीलवार अभ्यास सुरू आहे. 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेने 84 जागांवर विजय मिळवला होता. मात्र, नंतर शिंदे गटात झालेल्या मोठ्या फोडांमुळे ठाकरे गटाची संघटनात्मक रचना कोसळली होती. आता या रिकाम्या झालेल्या जागा नव्या कार्यकर्त्यांनी भराव्यात आणि पक्ष पुन्हा सक्षम व्हावा, या हेतूने ठाकरेंनी रणनीती आखली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांमध्ये अद्याप औपचारिक युतीची घोषणा झालेली नसली तरी, दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये संयुक्त बैठकांद्वारे जागावाटपावर चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षांची स्थानिक ताकद आणि प्रभाव लक्षात घेऊन काही निवडणूक क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पद्धतीने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले तर मुंबई महापालिकेतील समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!