मुंबई प्रतिनिधी : अंडर-19 आशिया कप स्पर्धेत भारताने मलेशियाचा 315 धावांनी पराभव करत स्पर्धेत विजयांची हॅटट्रिक साजरी केली. प्रथम फलंदाजी करत भारताने 7 बाद 408 धावांचा डोंगर उभारला, तर प्रत्युत्तरादाखल मलेशियाचा संघ अवघ्या 93 धावांत गडगडला. हा विजय अंडर-19 आशिया कपच्या इतिहासातील धावांच्या बाबतीत दुसरा सर्वात मोठा विजय ठरला.
मलेशियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र भारतीय फलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. सलामीला उतरलेल्या आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी यांनी डावाची सुरुवात केली. आयुष 14 धावांवर बाद झाला, तर वैभव सूर्यवंशीने 26 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांसह 50 धावांची आक्रमक खेळी केली. त्यानंतर वेदांत त्रिवेदीने संयमी फलंदाजी करत 106 चेंडूत 90 धावा केल्या.
या सामन्यात अभिज्ञान कुंडूने वादळी खेळी साकारली. त्याने 125 चेंडूत 17 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने नाबाद 209 धावा केल्या. 167.20 च्या स्ट्राईक रेटने खेळलेली ही खेळी सामन्याचा कणा ठरली आणि भारताला 408 धावांपर्यंत मजल मारता आली. मलेशियाकडून मुहम्मद अक्रमने महागडी गोलंदाजी करत 5 गडी बाद केले, तर सथनकुमारन आणि जाश्विन कृष्णमूर्ती यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
409 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मलेशियाचा डाव पूर्णपणे कोसळला. एकाही फलंदाजाला टिकून खेळता आले नाही. हमजा पंग्गीने सर्वाधिक 35 धावा केल्या, तर तीन फलंदाज शून्यावर बाद झाले. भारताकडून दीपेश देवेंद्रनने अप्रतिम गोलंदाजी करत 9 षटकांत 21 धावा देत 5 विकेट घेतल्या. उद्धव मोहनने 2, किशन कुमार सिंग, खिलन पटेल आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
या विजयासह भारताने उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले असून, मलेशियाचे आव्हान स्पर्धेतून संपुष्टात आले आहे. भारताचा उपांत्य फेरीतील सामना बांग्लादेश किंवा श्रीलंका यांच्याशी होण्याची शक्यता आहे.