पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे येत्या १८ आणि १९ फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. दिवंगत लेखक बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या शिवसृष्टी या ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ‘मोदी ॲट ट्वेन्टी’ या पुस्तकाचंही प्रकाशन शहा यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळं आता भाजपकडून गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याची जोरदार तयारी केली जात आहे.
गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यात भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार असून शहा हे पोटनिवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार असल्याची माहिती आहे. भाजपनं कसब्यातून हेमंत रासने आणि चिंचवडमधून आश्विनी जगताप यांना रिंगणात उतरवलं आहे. दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविआच्या नेत्यांना गळ घातली होती. परंतु विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निवडणुका बिनविरोध होणार नसल्याचं सांगितलं होतं.