मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून भाजप व ठाकरे गटात आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत शिवसेना (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मुंबईत सोमवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकार आणि केंद्रातील भाजप नेत्यांवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना राणेंनी थेट इशारा दिला. “आदित्य ठाकरे, तू मोदी, शाह, फडणवीस यांची नावं घेतलीस तर याद राख,” असे राणे म्हणाले. तसेच, खासदार संजय राऊत यांच्यावरही त्यांनी टीकास्त्र सोडले.
सोमवारी मुंबईत झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले, सार्वजनिक वाहतूक कोलमडली आणि नुकत्याच उद्घाटन झालेल्या भुयारी मेट्रो स्थानकांमध्येही पाणी शिरले. यावरून आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका करताना म्हटले होते की, नगरसेवक फोडण्यासाठी वापरले जाणारे पैसे मुंबईकरांचे हाल होणार नाहीत यासाठी खर्च झाले असते तर बरे झाले असते. याला उत्तर देताना राणेंनी २६ जुलै २००५ च्या मुसळधार पावसाची आठवण करून दिली. “तेव्हा ९४४ मिमी पाऊस पडला, उद्धव ठाकरेंचा वाढदिवस होता, त्यांची सत्ता होती, तरी मुंबई बुडाली नव्हती का?” असा सवाल त्यांनी केला.
राणेंनी आदित्य ठाकरेंना उद्देशून सवाल केले, “२००५ मध्ये महापालिकेत कुणाची सत्ता होती? मिठी नदी तेव्हा साफ केली होती का? वस्त्यांमध्ये पाणी का शिरले? तेव्हा तुझं वय किती होतं, आठवण कर!” त्यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. “राऊत बाळासाहेबांविरुद्ध बोलायचे, शिवसेनेत आले आणि आता सकाळी उठून प्रेसकडे धावतात,” अशी टीका राणेंनी केली. तसेच, उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांनी विचारले, “१९८५ च्या आधी तुमचं उत्पन्नाचं साधन काय होतं? बाळासाहेबांच्या नावावर बावळट मुख्यमंत्री झालात, पण फायनान्स आणि रोजगाराची माहिती आहे का?”
राणेंनी आदित्य ठाकरेंना थेट इशारा देताना म्हटले, “दिनो मोर्या कोण, त्याच्याकडे तू का जातोस, काय करता, मला सगळी माहिती आहे. पण मी शांत आहे. मोदी, शाह, फडणवीस यांची नावं घेऊ नको, नाहीतर संजय राऊत तुला आत घेऊन जाईल.” त्यांनी मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या मशीनच्या परवानगीवरून आणि इलेक्ट्रिक घोडागाडी खरेदीच्या व्यवहारात केतन कदम आणि दिनो मोर्याच्या भावाच्या सहभागावर सवाल उपस्थित केले. “हे मराठी आहेत का? शिवसैनिक आहेत का? उद्धव ठाकरेंनी किती शिवसैनिकांना कामे दिली?” असे प्रश्न राणेंनी विचारले. राणेंच्या या पत्रकार परिषदेने मुंबईतील पावसाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आदित्य ठाकरे आणि शिवसेना (यूबीटी) यावर काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.