सोलापूर : प्रतिनिधी
महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने मंगळवारी (दि. 18) सकाळी सात ते नऊ या वेळेत 12 ठिकाणांहून प्लॉग रन निघणार आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील पाच हजार विद्यार्थी एका वेळी रस्त्यांवर पडलेला कचरा गोळा करत रस्ते स्वच्छ करणार आहेत.
महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने हा अनोखा उपक्रम राबवला जाणार आहे. प्लॉग रन यांचा अर्थ असा की, धावताना किंवा चालताना आपण रस्त्यावर पडलेला कचरा उचलून तो योग्य ठिकाणी टाकायचा. हा उपक्रम आता संपूर्ण जगभर लोकप्रिय होत आहे. अनेक देशांमध्ये याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आपल्या शहरांमध्ये, रस्त्यांवर, उद्यानांमध्ये ठिकठिकाणी कचर्याचे ढीग पाहायला मिळतात. प्लास्टिकच्या बाटल्या, फेकलेले कपडे आणि इतर घाण हे पर्यावरणासाठी मोठा धोका निर्माण करतात. हा कचरा जमिनीत मिसळत नाही, प्राण्यांसाठी घातक ठरतो, पाणी आणि हवा प्रदूषित करतो आणि पर्यावरणाची हानी करतो. त्यामुळे अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
12 ठिकाणी एकाच वेळी या प्लॉग रन चे आयोजन केले आहे. शहरातील 70 शाळेतील पाच हजार विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. दोन किलोमिटर रस्त्यांवरील कचरा उचला जाणार आहे. आयुक्त शीतल तेली- उगले या सात रस्ता येथून निघाणारी प्लॉग रन या रॅली मध्ये सहभागी होणार आहेत.