ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटमध्ये कर्नाटक बस गाड्यांचे अनोखे स्वागत; चालक, वाहक, प्रवाशांना गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी

अक्कलकोट, दि.७ : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रचंड तापला असताना कर्नाटकामध्ये महाराष्ट्राच्या गाड्या फोडल्या जात असताना अक्कलकोटमध्ये मात्र काही राजकिय पक्षांच्यावतीने कर्नाटकामधून येणाऱ्या बसेस बाबत गांधीगिरी करून त्यांचे गुलाब पुष्प देऊन महाराष्ट्रात आगळे वेगळे स्वागत करण्यात आले. यातून कर्नाटकने धडा घ्यावा अन्यथा जशास तसे उत्तर देण्याचा निर्धार यावेळी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी वर्तविला.

पहिल्यांदा अक्कलकोटवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दावा केला. त्यानंतर तालुक्यातील काही गावांनी कर्नाटकमध्ये जाण्याचा ठराव केला. तिकडे बेळगाव, जतचा वाद पेटलेला आहे. असे असताना या आंदोलनाला हिंसक वळून लागण्याची शक्यता आहे असे असताना कर्नाटकच्या आंदोलकांना सद्बुद्धी मिळावी,यासाठी रासपचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर, रिपाई तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे, रासप तालुकाध्यक्ष दत्ता माडकर, प्रहार संघटनेचे अमर शिरसट, बाळासाहेबांची शिवसेनाचे शहरप्रमुख योगेश पवार यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत कर्नाटक डेपोच्या चालक आणि वाहकांच्या सत्कार करून पुष्पहार घालून गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

केवळ चालक आणि वाहकाचे स्वागत न करता बसमध्ये बसलेल्या प्रवाशांनाही गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी केली. या अनोख्या आंदोलनाने अक्कलकोट शहर आणि तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्राचा सीमावाद केंद्राने हस्तक्षेप करून थांबवावा अन्यथा हा वाद पेटून दोन्ही राज्याचे नुकसान होईल आणि कोणीही वादग्रस्त विधान करून आगीत तेल ओतू नये अशा प्रकारची अपेक्षा नेत्यांनी व्यक्त केली. यावेळी आंदोलनकर्त्या विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!