समाजोन्नतीसाठी एकसंघ राहून निर्भयपणे कार्य करा : म्हेत्रे ; अक्कलकोट येथे वीरशैव माळी समाजातर्फे कार्यक्रम
अक्कलकोट,दि.८ : एकसंघ होऊन विधायक कार्य केल्यास समाजाची उन्नती होऊन लौकीक वाढतो. यासाठी समाजबांधवानी निर्भयपणे कार्य करावे, असे आवाहन माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले. वीरशैव माळी समाज अक्कलकोट शहराच्यावतीने विरक्त मठ अक्कलकोट येथे म.नि.प्र. प्रभूशांतलिंग महास्वामीजी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी म्हेत्रे यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन व वितरण करण्यात आले.
प्रारंभी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून परमपूज्य ज्ञानयोगी लि.श्री सिध्देश्वर स्वामीजी यांच्या स्मृतीस अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली. समाजकार्य करताना टीका-टिप्पणी होऊ लागली की, आपले कार्य प्रगतीपथावर आहे असे समजून आणखी जिद्धीने पुढे जावे, असेही म्हेत्रे यावेळी म्हणाले. स्वामीजींनी आपल्या आशीर्वचनातून समाजाच्या कार्याची स्तुती करत समाजोपयोगी कार्याची व्याप्ती वाढावी, यासाठी आणखी प्रयत्न व्हावा असा कानमंत्र दिला.
यावेळी तालुका महिला काँगेस अध्यक्षा शीतल म्हेत्रे, बाबुराव रामदे, संतोष पराणे, काशिनाथ गोळ्ळे, प्रा.विजयकुमार लिंबीतोटे, दिलीप अडवितोटे, शशिकांत लिंबीतोटे, काशिनाथ इसापूरे, शिवचलप्पा काळी, शिवप्पा संगोळगी, शशिकांत बकरे, सुभाष बकरे, सुनिता हडलगी, डॉ.शिवलीला माळी आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष मल्लीनाथ नंदिकोले, उपाध्यक्ष डॉ.बसवराज चिणकेकर, विजयकुमार हडलगी,राजशेखर म्हेत्रे, प्रसाद दुधनी, विरेश कोळ्ळे, अशोक म्हेत्रे, सिद्धाराम माळी , गिरीष माळी, ओंकार अडवितोटे, सुनिल इसापूरे यांनी परिश्रम घेतले.सुत्रसंचलन बाळकृष्ण म्हेत्रे यांनी केले तर आभार परमेश्वर बोधले यांनी मानले.
या कार्यक्रमास वीरशैव माळी समाज शहर, माळी समाज युवक संघटना, महाराष्ट्र माळी समाज महासंघ आदी संघटनांचे पदाधिकारी व तालुक्यातीत वीरशैव लिंगायत माळी समाजातील बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते.