नवी दिल्ली: कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. अर्थव्यवस्थाच डबघाईला गेली नाही तर शैक्षणिकही मोठे नुकसान झाले आहे. शैक्षणिक वर्ष वाया गेलेच सोबतच एमपीएससी-युपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अखेरची संधीही कोरोनाने हिरावली आहे. २०२० मध्ये युपीएससीची परीक्षा कोरोनामुळे झाली नाही त्यामुळे शेवटची संधी असणाऱ्यांना एक संधी दिली जाईल अशी अपेक्षा होती. मात्र सुप्रीम कोर्टाने मोठा निकाल दिला आहे. ज्या विद्यार्थ्यांची २०२० मधली युपीएससीची देण्याची संधी हुकली, त्यांना ती पुन्हा देता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. संधी वाढवून देण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, न्या. इंदू मल्होत्रा आणि न्या. अजय रस्तोगी यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
लॉकडाऊनच्या काळात स्पर्धा परीक्षा नियोजित वेळापत्रकापेक्षा उशिराने ऑक्टोबर २०२०मध्ये घेण्यातआल्या या पार्श्वभूमीवर काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालायात याचिका दाखल केली होती. करोना आणि लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. त्यामुळे, ज्या विद्यार्थ्यांना २०२१ची UPSC पूर्वपरीक्षा उत्तीर्ण करता आली नाही, त्यांना ठरलेल्या संधींपेक्षा एक अतिरिक्त संधी मिळावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत ही याचिका फेटाळून लावली.