नवी दिल्ली वृत्तसंस्था : अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात अपयश आल्यानंतर टीम इंडियाचा युवा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीने जोरदार पुनरागमन करत क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. यूएसए विरुद्ध अवघ्या 2 धावांवर बाद झालेल्या वैभवने दुसऱ्याच सामन्यात बांगलादेशविरुद्ध झंझावाती अर्धशतकी खेळी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
बांगलादेशविरुद्ध खेळताना वैभवने अवघ्या 30 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. या अर्धशतकासह त्याने अंडर 19 वर्ल्ड कप आणि यूथ वनडे क्रिकेटमध्ये भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीचा महत्त्वाचा विक्रम मोडीत काढला. वैभव अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा भारतीय फलंदाज ठरला.
वैभवने 67 चेंडूत 107.46 च्या स्ट्राईक रेटने 72 धावांची दमदार खेळी केली. या खेळीत त्याने 3 षटकार आणि 6 चौकार लगावत भारतीय धावसंख्येला वेग दिला. शतकाकडे वाटचाल सुरू असतानाच वैभव 28 धावांअगोदर बाद झाला, त्यामुळे त्याचं शतक थोडक्यात हुकलं.
या सामन्यातील कामगिरीसह वैभव सूर्यवंशी यूथ वनडे क्रिकेटमध्ये 1 हजार धावा पूर्ण करणारा सर्वात वेगवान भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने अवघ्या 20 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. याआधी विराट कोहलीने 28 सामन्यांमध्ये 978 धावा केल्या होत्या. तसेच वैभवच्या खात्यात यूथ वनडेत 3 शतकं आणि 5 अर्धशतकं जमा झाली आहेत, जी कामगिरी विराटपेक्षाही सरस मानली जात आहे.
दरम्यान, आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारताने या स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. पहिल्या सामन्यात भारताने यूएसएला 107 धावांवर गुंडाळलं. पावसामुळे डीएलएसनुसार मिळालेलं 96 धावांचं आव्हान भारताने अवघ्या 17.2 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं.
अपयशानंतर असा दणदणीत कमबॅक करणारा वैभव सूर्यवंशी सध्या भारतीय चाहत्यांसाठी आशेचा किरण ठरत असून, त्याच्याकडून या स्पर्धेत भारताला वर्ल्ड कप मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.