अकोला : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून आता नुकतेच प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतली आहे. वंचितने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात पक्षाने रावेर विधानसभा मतदारसंघात शमिभा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. शमिभा या ट्रान्सजेंडर असून, लेवा पाटील आहेत.
महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचा फड रंगणार आहे. यासाठी सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू आहे. त्यांच्यात चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीने शनिवारी एका ट्विटद्वारे आपल्या 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत वंचितने उमेदवाराच्या नावासह त्याच्या जातीचाही उल्लेख केला आहे.
वंचित बहुजन आघाडीने रावेर विधानसभा मतदारसंघात शमिभा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. शमिभा पाटील या ट्रान्सजेंडर असून, लेव्हा पाटील आहेत. सिंदखेड राजा येथून पक्षाने सविता मुंढे यांना मैदानात उतरवले आहे. याशिवाय वाशिम येथून मेघा किरण डोंगरे, धामनगाव रेल्वे येथून नीलेश टी विश्वकर्मा, नागपूर दक्षिण पश्चिम येथून विनय भांगे, साकोळी मतदारसंघात डॉक्टर अविनाश नान्हे, नांदेड दक्षिण येथे फारुख अहमद यांना, लोहा विधानसभेत शिवा नरंगळे यांना, औरंगाबाद पूर्व येथून विकास रावसाहेब दांडगे यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीने शेवगाव विधानसभेची उमेदवारी किसन चव्हाण यांना दिली आहे. तर खानापूर विधानसभेसाठी वंचितने संग्राम कृष्णा माने यांना मैदानात उतरवले आहे.
वंचितने आपल्या आघाडीतील भारत आदिवासी पार्टी (बीएपी) व गोंडवाना गणतंत्र पार्टी (जीजीपी) या 2 पक्षांच्या प्रत्येकी एका उमेदवाराचीही घोषणा केली आहे. वंचितने बीएपीच्या अनिल जाधव यांना चोपडा (एसटी) या राखीव मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर जीजीपीच्या हरीश उईके यांना रामटेक येथून मैदानात उतरवले आहे. या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करताना आम्हाला आनंद होत असल्याचे वंचितने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.