ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सूर्यग्रहणामुळे वटवृक्ष मंदिर नित्यक्रमात बदल, ग्रहण पर्वात स्वामी दर्शन बंद राहील : इंगळे

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट, दि.२३ : अश्विन अमावस्या मंगळवार दि. २५ ऑक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण असल्याने पुरोहित मोहन पुजारी यांनी दिलेल्या माहितीनुसार या दिवशी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या नित्यक्रमात व स्वामींच्या दिनक्रमात बदल करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली.

ग्रहणाचे वेध मंगळवार दि.२५ रोजी पहाटे ३:३० पासून सुरू होणार आहेत. ग्रहणाचे स्पर्श मंगळवारीच दुपारी ४ वाजून ४९ मिनिटांनी होईल. ग्रहणाचे मध्य सायंकाळी ५ वाजून ४३ मिनिटाला राहणार आहे. यानंतर ग्रहणाचे मोक्ष सूर्यास्ताप्रसंगी सायंकाळी ६ वाजून ८ मिनिटांनी होणार आहे. मंगळवारी पहाटे ३:३० पासून सायंकाळी ६ वाजून ८ मिनिटापर्यंत ग्रहणाचे वेध पाळावेत. बाल, वृद्ध,आजारी,अशक्त व गर्भवती स्त्रीयांनी दुपारी १२:३० पासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत अशी माहिती पुरोहित मंदार महाराज पुजारी यांनी दिली. मंगळवार दि.२५ ऑक्टोंबर रोजी संपूर्ण दिवसभर ग्रहणाचे वेध असल्याने वटवृक्ष मंदिरात पहाटेची काकड आरती, दुपारची नैवेद्य आरती, रात्रीची शेजारती होणार नाही याची भाविकांनी नोंद घ्यावी.

ग्रहण पर्वात दुपारी ४:३० ते रात्री ८ वाजेपर्यंत श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील स्वामींचे दर्शन बंद राहील. दि.२५ ऑक्टोबर रोजीच रात्री ८ नंतर भाविकांसाठी पुन्हा स्वामी दर्शनास नेहमीप्रमाणे सुरुवात होईल.याचीही स्वामी भक्तांनी नोंद घेऊन मंदिर समितीस सहकार्य करावे,असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!