ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ज्येष्ठ अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक : उपचारांसाठी शिर्डी संस्थानकडून 11 लाखांची मदत मंजूर !

मुंबई : वृत्तसंस्था 

मुंबईतील ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती चिंताजनक असून ते गेल्या काही महिन्यांपासून उपचार घेत आहेत. ‘शिर्डी के साईं बाबा’ (1977) या चित्रपटातील साईबाबांच्या भूमिकेमुळे ते घराघरात पोहोचले. सध्या सेप्सिस या गंभीर संसर्गाने त्यांची तब्येत बिघडली असून लीलावती रुग्णालयात 8 ऑक्टोबरपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची गरज निर्माण झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी चाहत्यांना आणि चित्रपटसृष्टीतील व्यक्तींना मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनानंतर अनेकांकडून मदत मिळू लागली असून रिद्धिमा कपूर यांनीही मदत केली आहे.

दरम्यान, शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्टने सुधीर दळवी यांच्या उपचारांसाठी 11 लाख रुपये देण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाकडून मागितली होती. न्यायालयाच्या मागील आदेशानुसार अशा खर्चासाठी मंजुरी आवश्यक असल्याने ही प्रक्रिया राबवण्यात आली. न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठाने ट्रस्टला मदत मंजूर केली.

न्यायालयाने निरीक्षण केले की साईबाबांची भूमिका साकारत दळवींनी जनमानसात भक्तीचा संदेश पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अशा कलाकाराला मदत करणे ही मानवतेची सेवा असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

सध्या दळवी अंथरुणाला खिळले असून दोन केअरटेकर आणि फिजिओथेरपिस्टच्या मदतीने त्यांची देखभाल केली जात आहे. त्यांच्या पत्नीच्या माहितीनुसार, पूर्णपणे बरे होण्यासाठी किमान एक वर्ष लागू शकतो. आतापर्यंत 10 लाखांहून अधिक खर्च झाल्याने कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले असून 15 लाखांच्या मदतीची मागणी करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!