मुंबई वृत्तसंस्था : भारतीय बँकिंग व्यवस्थेवर करडी नजर ठेवणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मोठी कारवाई करत देशातील आघाडीच्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या कोटक महिंद्र बँकेवर 61.95 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमांचे उल्लंघन, कामकाजातील बेफिकीरपणा आणि नियामक सूचनांकडे दुर्लक्ष केल्याच्या गंभीर प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
आरबीआयच्या तपासात कोटक महिंद्र बँकेने बँकिंग सेवांशी संबंधित अनेक अनिवार्य मानकांचे पालन न केल्याचे उघड झाले. विशेषतः ‘बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाऊंट’ (BSBDA) संदर्भात मोठी अनियमितता आढळून आली. नियमांनुसार पात्र ग्राहकाला केवळ एकच बीएसबीडी खाते ठेवण्याची मुभा असताना, बँकेने आधीच खाते असलेल्या ग्राहकांची अतिरिक्त खाती उघडल्याचे समोर आले.
याशिवाय बँकेच्या बिझनेस कॉरस्पॉन्डेंट्स (BC) मार्फत अधिकार क्षेत्राबाहेरील कामे करून घेतल्याचेही तपासात निष्पन्न झाले. इतकेच नव्हे, तर काही कर्जदारांची चुकीची माहिती क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी (क्रेडिट ब्युरो) कडे पाठवण्यात आल्याचा गंभीर प्रकारही समोर आला आहे. अशा चुकीच्या माहितीतून संबंधित व्यक्तींच्या क्रेडिट स्कोअरवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, त्यामुळे हा मुद्दा अधिक संवेदनशील मानला जात आहे.
दंड ठोठावण्यापूर्वी आरबीआयने कायदेशीर प्रक्रियेचे संपूर्ण पालन केले. कोटक महिंद्र बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. बँकेकडून उत्तर व कागदपत्रे सादर करण्यात आली, मात्र सखोल तपासणीनंतर आरबीआयचे समाधान न झाल्याने ही कारवाई करण्यात आली.
तपासात बँकेने बँकिंग रेग्युलेशन कायदा कलम 47A (1)(c) तसेच क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या (नियमन) कायदा, 2005 मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळेच आरबीआयने आपले अधिकार वापरत कोटक महिंद्र बँकेवर 61.95 लाख रुपयांचा दंड ठोठावला असून, बँकिंग नियमांबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश केंद्रीय बँकेने दिला आहे.