2026 वर्षाची सुरुवात टीम इंडियाने दणदणीत विजयाने केली आहे. कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडवर 4 विकेट्सने मात केली. न्यूझीलंडने भारतासमोर 301 धावांचं आव्हान ठेवलं होतं, मात्र टीम इंडियाने हे लक्ष्य 6 चेंडू राखून पूर्ण करत 49 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 306 धावा केल्या. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
विशेष म्हणजे 2025 पासून न्यूझीलंडविरुद्ध भारताचा हा सलग आठवा एकदिवसीय विजय ठरला आहे. आणखी उल्लेखनीय बाब म्हणजे हे सर्व आठही सामने भारताने धावांचा पाठलाग करताना जिंकले आहेत. या विजयात अनुभवी फलंदाज विराट कोहली याची खेळी निर्णायक ठरली. कोहलीने सर्वाधिक 93 धावा करत भारताच्या विजयाचा कणा मजबूत केला. त्याला रोहित शर्मा, कर्णधार शुबमन गिल आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर यांनी भक्कम साथ दिली. शेवटच्या टप्प्यात हर्षित राणा आणि केएल राहुल यांनी प्रत्येकी 29 धावा करत भारताचा विजय निश्चित केला.
नाणेफेक जिंकून शुबमन गिलने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेलने सर्वाधिक 84 धावा केल्या. ओपनर हेन्री निकोल्सने 62, तर डेव्हॉन कॉनवेने 56 धावा करत संघाला मजबूत धावसंख्या उभारून दिली. इतर फलंदाजांच्या योगदानामुळे न्यूझीलंडने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 300 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
भारताच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी 39 धावांच्या भागीदारीने केली. रोहित 26 धावांवर बाद झाला. त्यानंतर गिल आणि विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत भारताच्या विजयाचा पाया रचला. या जोडीने 107 चेंडूत 118 धावांची भागीदारी केली. गिलने 71 चेंडूत 56 धावा केल्या.
यानंतर विराट आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी केली. विराट 93 धावांवर बाद झाला. त्यानंतर भारताने अवघ्या 45 धावांत 4 विकेट्स गमावल्याने सामना रंगतदार वळणावर आला. भारताची स्थिती 2 बाद 234 वरून 6 बाद 279 अशी झाली.
अखेरीस केएल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी संयमी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. राहुल नाबाद 29, तर सुंदर 7 धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून कायले जेमीसनने 4 विकेट्स घेतल्या, मात्र त्याचा संघाला विजय मिळवून देण्यात उपयोग झाला नाही.