विश्वन्युज मराठी इंपॅक्ट…! दुधनी स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी अखेर ९५ लाखांचा निधी मंजूर; संचारच्या वृत्ताची दखल
दुधनी : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील भाजीपाला मार्केट जवळील हिंदू स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी अखेर ९५ लाख रुपये मंजूर केले आहेत. नगराध्यक्ष भीमाशंकर इंगळे यांनी ही माहिती दिली. याबाबत गेल्याच आठवड्यात विश्वन्युज माराठीने स्मशानभूमीच्या दुरुस्तीविषयी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर या विषयाची चर्चा झाली होती.
गेल्या अनेक दिवसांपासून भाजीपाला मार्केट जवळील हिंदू स्मशान भूमीची दुरावस्था झाली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे निर्माण झाली आहेत. दुधनीत शेवटचा प्रवास देखील खडतरच सुरू आहे. रस्त्याची अवस्था देखील अत्यंत दयनीय बनली आहे. दहन शेड होता पण इतर सोयीसुविधा त्याठिकाणी नव्हत्या. अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना बसण्याची सुविधा नाही.पेव्हर ब्लॉक नव्हते. त्याठिकाणी पाण्याची सुविधा नाही.
यासाठी नगरपरिषदेने वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत हा निधी मंजूर झाला असून या कामांमध्ये वॉल कंपाऊंडचे दुरुस्ती करून बांधकाम करणे, स्मशानभूमीमध्ये काँक्रीट रस्ता विकसित करणे, दहन शेड बांधणे, स्मशानभूमीमध्ये वेटिंग रूम बांधणे, सॅनिटरी युनिट बसवणे, पेवर ब्लॉक बसवणे यासह इतर कामासाठी हा मोठा निधी उपलब्ध झाल्याची माहिती नगराध्यक्ष भीमाशंकर इंगळे यांनी दिली.
फेब्रुवारी २०२२ पर्यंत हे काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रशासकीय मंजुरीचा आदेशही प्राप्त झाल्याची माहिती नगराध्यक्ष भीमाशंकर इंगळे दिली आहे. त्यामुळे दुधनीच्या नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.