मुंबई : १ जानेवारी २०१८ ला कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाजवळ शौर्य दिन साजरा करण्यासाठी लोक जमले होते. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या लोकांवर दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे घडलेल्या हिंसाचारा एका तरुणाचा मृत्यू झाला होता. यावेळी अनेक वाहनांची जाळपोळ झाली, मालमत्तेचं नुकसान झालं. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले होते.
आता या प्रकरणी कोरेगाव भीमा प्रकरणी विश्वास नांगरे पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार घडला त्यावेळी विश्वास नांगरे पाटील हे कोल्हापूर परिपरिक्षेत्राचे महानिरीक्षक होते तर सुवेझ हक हे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक होते. याशिवाय सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी पवार हे या प्रकरणात तपास अधिकारी होते.
या प्रकरणाची २१ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान सह्याद्री अतिथीगृह इथे या सगळ्यांची चौकशी होणार आहे. हर्षाली पोतदारची २१ आणि २२ जानेवारी, डॉ. शिवाजी पवार यांची २१ ते २३ जानेवारी, विश्वास नांगरे पाटील यांची २४ आणि जानेवारी आणि सुवेझ हक यांची २४ ते २५ जानेवारी दरम्यान चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कोरेगाव भीमामध्ये २०१८ मध्ये झालेल्या हिंसाचारानंतर राज्य सरकारने या प्रकरणी कोलकाता हायकोर्टाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जे.एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या नेतृत्वाखाली चौकशी आयोग नेमला आहे. मागील दोन वर्षांपासून या आयोगासमोर कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.