पंढरपूर : वृत्तसंस्था
देशभरातील अनेक पर्यटन स्थळ व मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली असल्याने राज्यातील अनेक मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडी होती तर दुसरीकडे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सजविण्यात आले आहे. मंदिरात आकर्षक फळा-फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल रुक्मिणी गाभारा फळा, फुलांची भरून गेला आहे. पुण्यातील प्रदीप ठाकूर पाटील या भक्ताने ही सजावट केली आहे. या सजावटीमुळे विठुरायाचे सावळे रूप अधिकच खुलून दिसत आहे.
नवीन वर्षाची सुरुवात विठुरायाच्या दर्शनाने व्हावी यासाठी राज्यभरातून हजारो भाविक रविवारी (३१ डिसेंबर) रात्रीच पंढरपुरात दाखल झाले होते. रविवारी पहाटेपासूनच भाविकांनी रांगा लावत विठुरायाचे दर्शन घेतले. यावेळी विठ्ठल-रुक्मिणीच्या नाम-गजराने परिसर दुमदुमून गेला होता. दरम्यान, विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फळा-फुलांची सजावट करण्यासाठी झेंडू ,गुलाब, आस्टर, मोगरा, गुलछडी यासह विविध देशी विदेशी सुमारे २ टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. देवाचा गाभारा, प्रवेशद्वार, सोळखांबी आणि सभामंडपामध्ये सजावट करून मंदिर आकर्षक बनवण्यात आलं आहे.