अक्कलकोट तालुक्यात पाच ग्रामपंचायतींना निवडणुकीची प्रतीक्षा
समर्थ नगरमध्ये मोठी उत्सुकता; प्रशासकांच्या हाती कारभार
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यात मुदत संपलेल्या पाच ग्रामपंचायतींना आता निवडणुकीची प्रतीक्षा आहे.प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत पूर्ण झाली असली तरी प्रशासकांच्या हातात कारभार असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात तशा ५० ग्रामपंचायती आहेत ज्यावर प्रशासक आहे.
अक्कलकोट तालुक्यातील संगोगी ब,सातनदुधनी,कल्लप्पावाडी, समर्थ नगर आणि गांधीनगर या पाच ग्रामपंचायतीचा यात समावेश आहे. मध्यंतरी सोलापूर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ५० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने प्रभाग रचना व अन्य आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून ठेवली आहे.प्रक्रिया पूर्ण आहे परंतु ग्रामपंचायतीच्या निवडणुकीबाबत राज्य निवडणूक आयोग आदेशच काढत नसल्याने या ग्रामपंचायती अद्यापही प्रशासकांच्या ताब्यात आहेत. अक्कलकोट शहरालगत असलेली समर्थ नगर ही मोठी ग्रामपंचायत आहे.या ठिकाणी अनेक दिवसांपासून मुदत संपली आहे. अनेक जण निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.
मात्र प्रक्रिया सुरू नसल्याने इच्छुकांमध्ये नाराजी दिसत आहे.इच्छुकांची संख्या मोठी असल्याने त्या ठिकाणी मोठी उत्सुकता आहे. दरम्यान सोलापूरसह राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती,महानगरपालिका व नगरपरिषद ,नगरपंचायतीच्या निवडणूका तर गेल्या तीन वर्षापासून रखडले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाचा तर पत्ताच नाही.निवडणूक लांबणीवर पडल्याने इच्छुकांच्या आशेवरही पाणी पडले आहे. ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचनेचा विषय सर्वोच्च न्यायालयात गेल्याने या निवडणुका प्रलंबित असल्याचे बोलले जात आहे परंतु ग्रामपंचायतीच्या निवडणूका घेण्यास काहीच अडचण नाही तरीही निवडणुका पुढे जात असल्याने संबंधित गावांमध्ये या विषयाबद्दल उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. लवकरच या ठिकाणी निवडणुका जाहीर होतील असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात तारीख समोर येत नसल्याने अद्यापही या गावांमध्ये निवडणुकीच्या अधिकृत तारखेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.