अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
यंदाचा उन्हाळा कडक आहे त्यामुळे फेब्रुवारीमध्येच अनेक जलस्त्रोत कोरडे पडले असून नदीकडच्या गावांनी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाकडून देखील धरणातून दुसरे आवर्तन सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तालुक्याला वरदायनी ठरलेल्या कुरनूर धरणात सध्या २८ टक्के पाणी साठा शिल्लक आहे.यातील २० टक्के पाणी साठा हा धरणामध्ये मृत साठ्यामध्येच राहतो. तर ८ ते १० टक्के पाणी हे खालच्या भागात सोडण्याचे नियोजन ठरले असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
खाली एकूण आठ बंधारे आहेत ते शेवट पर्यंत भरतील की नाही याबाबत शंका आहे.तरीही खालच्या लोकांची पाणी सोडण्याची मागणी आहे.कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत दोन वेळा पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता.परंतु पाणी कमी असल्याने काय करायचे हा प्रश्न होता.त्यामुळे शुक्रवारी पुन्हा यासंदर्भात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सोबत अधिकाऱ्यांची बैठक होऊन बुधवारपर्यंत पाणी सोडण्याचा अंतिम निर्णय झाला आहे. या निर्णयामुळे नदीकाठच्या गावांना दिलासा मिळणार आहे.