सोलापूर : वृत्तसंस्था
जलवाहिनी दुरुस्तीसाठी १ व २ एप्रिल रोजी शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे एका रोटेशनसाठी शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. यामुळे शहराचा पाणीपुरवठा पुन्हा एकदा आठवडाभरासाठी विस्कळीत राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या टाकळी-सोलापूर मुख्य पाईप लाईनवर सोरेगाव येथे देगाव शाखा कालवा व हत्तुर नाला येथे जोडणीचे काम दि. १ व २ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. याअंतर्गत जोडणी व अन्य दुरुस्तीच्या कामासाठी टाकळी पंपहाऊस बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी, शहराचा पाणीपुरवठा एका रोटेशनसाठी पाच दिवसाआड होणार आहे. अत्यल्प पावसामुळे सध्या उजनी धरण वजा ३६ टक्के आहे. त्यामुळे धरणाजवळ दुबार पंपिंग करून पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. अशातच हिप्परगा तलावातील पाण्याची पातळी अत्यल्प आहे. या दोन्ही बाबींचा विचार करता शहराला पाण्याची कमतरता भासणार आहे. यामुळे पाण्याचा जपून वापर करणे नागरिकांना भाग आहे.
औज बंधारा येथील उपलब्ध पाण्याचा साठा जास्तीत जास्त टिकविण्यासाठी शहरातील मेडिकल पंपगृह, जुळे सोलापूर एम.बी.आर., नेहरु नगर टाकी परिसर व सोरेगाव पाईप लाईनवरील पाणीपुरवठा यापुढे पाच दिवसाआड होणार आहे. त्यामुळे या लाईनवर अवलंबून असलेल्या नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.