ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आम्ही राऊत यांच्याकडे लक्ष देत नाही ; कॉंग्रेस नेत्यांचा पलटवार !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी केली असतांना आता महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्याने महाविकास आघाडीत बिघाडी पाहायला मिळत आहे. हरियाणातील काँग्रेसच्या पराभवानंतर महाविकास आघाडीमध्ये शाब्दिक वॉर रंगले असून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत काय बोलतात, काय लिहितात याकडे आम्ही लक्ष देत नाही, असा पलटवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. सोबतच त्यांना महाराष्ट्र आणि हरियाणा यातील फरक कळत नाही, अशी पुस्तीही पटोले यांनी जोडली आहे.

काँग्रेसला स्वबळावर लढायचे असेल, तर त्यांनी तशी घोषणा करावी, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी व्यक्त केली. त्यावर पटोले यांनी आम्ही त्यांच्या कथनावर प्रतिक्रिया देत नाही, असे प्रत्युत्तर दिले आहे. राऊत काय बोलतात, काय लिहितात हा त्यांचा विषय आहे. मी त्यांच्या बोलण्यावर जास्त प्रतिक्रिया देत नाही. वेळ आल्यावर प्रतिक्रिया देईन. जे होते ते चांगल्यासाठी, असे समजून चालायचे असते.

राऊत यांना त्यांच्या वक्तव्याचा जाब मी विचारणार आहे, असे सांगून पटोले म्हणाले, महाविकास आघाडीत आपण समन्वयाने राज्यात काम करत आहोत. त्यातून चांगला संकेत जावा, असा माझा राऊत यांना सल्ला आहे. सुरुवातीपासून महाराष्ट्रात निवडून येण्याची क्षमता या निकषानुसार जागावाटप व्हावे, अशी आमची भूमिका आहे. त्यानुसारच काम सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार जागरूक आहेत, असे राऊत यांना का सांगावे वाटते, हाही त्यांचा प्रश्न आहे. काँग्रेस पक्ष अहंकारी नसून, खरे अहंकारी लोक सत्तेत बसले आहेत, असा टोलाही पटोले यांनी महायुतीला लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!