ठाणे : वृत्तसंस्था
राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्साह सुरु असतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील ठाण्यात दहीहंडी फोडली आहे. यावेळी त्यांनी विरोधकांना देखील फटकारले आहे. विरोधकांना किती रडगाणे गाऊ द्या, विधानसभेची दहीहंडी आम्हीच फोडणार, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे व्यक्त केला.
कितीही विरोध झाला तरी एकनाथ शिंदे काम करत राहणार, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांना लागवला. लाडक्या बहिणीप्रमाणेच सुरक्षित बहीण ही जबाबदारीदेखील शासनाचीच आहे. शासनाने ही जबाबदारी निश्चितपणे स्वीकारली आहे. आमच्या लाडक्या बहिणींवर वाकडी नजर टाकणार्याला फाशी देणार. या शासनदरबारी गुन्हेगाराला माफी नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी गुन्हेगारांना इशारा दिला.
अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी पापाची हंडी फोडली. त्यातून महाराष्ट्रामध्ये पुण्याची हंडी उभारली आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. 2024 मधली विधानसभेची हंडीदेखील आम्हीच फोडणार असल्याचा दावाही त्यांनी केला.