अहिल्या नगर : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाचा मोर्चा 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार आहे. आरक्षणासाठी ही आरपारची लढाई असून, विजयाचा गुलाल घेऊनच माघारी परतणार, असा विश्वास मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी येथे व्यक्त केला.
सकल मराठा समाजाच्या मुंबई मोर्चाची पूर्वतयारी सुरू असून, या पार्श्वभूमीवर जरांगे यांच्या जिल्हानिहाय गाठीभेटी सुरू आहेत. रविवारी (दि.10) येथील शासकीय विश्रागृहात मराठा समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते, समन्वयक तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या गाठीभेटी घेऊन जरांगे यांनी मोर्चाबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा महासंघाचे अध्यक्ष इंजि. सुरेश इथापे, गोरख दळवी व पदाधिकारी उपस्थित होते.
जरांगे म्हणाले की, प्रत्येक गावातून घरटी एक गाडी मोर्चात सहभागी व्हावी. ओबीसींच्या लढ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उतरणार अशी घोषणा त्यांनी केली. राज्याच्या प्रमुख व जबाबदार व्यक्तींनी एका समाजासाठी अशी घोषणा करणे योग्य नाही.
मराठा समाजाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंचा द्वेष दिसून आला आहे. सत्ताधारी पक्षातील मराठा नेत्यांना जाणूनबुजून संपविण्याचे कटकारस्थान ते करीत आहेत. मराठा समाजातील अधिकार्यांनाही त्रास दिला जात असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला. मराठा मंत्र्यांनी एकत्र येऊन अॅक्शन पॉवर कमिटी स्थापन करावी, असे आवाहन त्यांनी केले.
आंदोलन सुरू झाल्यापासून दोन वर्षांत 58 लाख कुणबी दाखले मिळाले आहेत. मराठा जात एक झाली आहे. सर्व जातींच्या मुलींना मोफत शिक्षण मिळत आहे. 29 ऑगस्टचे आंदोलनही निर्णायक ठरणार असा विश्वासही जरांगे यांनी व्यक्त केला. दरम्यान, जरांगे यांच्या दिवसभर गाठीभेटी सुरू होत्या. रक्षाबंधनाचा मुहूर्त साधत अहिल्यानगर येथील दहा वर्षांच्या श्रेया कोरेकर या मुलीने जरांगे यांना राखी बांधली.