मुंबई वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून राज्यात हुडहुडी वाढत आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यात कोरडे वातावरण असले तरी नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि घाट भागात थंडीची लाट जाणवणार आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये विशेषत: मध्यरात्री तापमानात लक्षणीय घट झाली आहे.
काल मंगळवारी रात्री अहिल्यानगरमध्ये कडाक्याची थंडी पडून तापमान 9.7 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले, जे या हंगामातील राज्यातील सर्वात कमी तापमान नोंदले गेले आहे. गेल्या आठवड्यात सरासरी किमान तापमान 12°C ते 14°C दरम्यान होते. तथापि, थंड उत्तरेकडील वाऱ्यांच्या आगमनाने हिवाळ्याची थंडी आणखीनच वाढली असून, राज्यभरातील अनेक भागात तापमान 13°C च्या खाली गेले आहे.
पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भातील काही भाग आणि उत्तर महाराष्ट्रात पहाटेच्या सुमारास गारठा जास्त वाढला असून 8-10 डिग्री सेल्सियसपर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली आहे. काही ठिकाणी 12 अंश डिग्री सेल्सियसपर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
हवामान खात्यानुसार येत्या काही दिवसांत तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. थंडीची तीव्रता वाढण्याची अपेक्षा असताना, नोव्हेंबरच्या अखेरीस ढगाळ हवामानाचाही अंदाज आहे, ज्यामुळे तात्पुरता आराम मिळू शकतो किंवा तापमानात आणखी घट होऊ शकते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्या संपूर्ण महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. येत्या 48 तासात सामान्यपासून दीड ते तीन अंश सेल्सियस तापमान कमी होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. केरळ, माहे, किनारी आंध्र प्रदेश, यानाम, रायलसीमा आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. आज रात्री/सकाळी हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या विविध भागात दाट धुके पडण्याची शक्यता आहे.