मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणावरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या चर्चांना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या सूचक वक्तव्यामुळे नवे परिमाण मिळाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यांवर अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर 17 जानेवारी रोजी शरद पवार आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत जयंत पाटील यांच्या निवासस्थानी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात बैठक झाल्याचा दावा शरद पवार गटातील काही नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे.
मात्र, या दाव्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होणार असते, तर अजित पवार यांनी आपल्याला याबाबत निश्चित माहिती दिली असती, असा दावा त्यांनी केला होता. अजित पवार माझ्याशी सर्व बाबी शेअर करायचे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.
या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक चर्चेत प्रतिप्रश्न उपस्थित करत म्हटले, “विलीनीकरणाच्या चर्चेत जे उपस्थित नव्हते, त्यांना त्या बैठकीबद्दल काय माहिती असणार?” शरद पवारांच्या या एका वाक्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भूमिकेवर अप्रत्यक्षपणे सवाल उपस्थित झाल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, अजित पवार गटातील नेते मागील काही दिवसांपासून अशा कोणत्याही विलीनीकरणाच्या चर्चा झाल्याचे ठामपणे नाकारत आहेत. असे असतानाही शरद पवार यांनी बैठकीचा उल्लेख करत सूचक भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घडामोडींमुळे शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा नवा राजकीय वाद उभा राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या पोकळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाची दिशा, पक्षाची पुढील भूमिका आणि सत्तासमीकरणे याबाबत विविध तर्क मांडले जात आहेत.
दरम्यान, शरद पवार हे मंगळवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होण्यासाठी दिल्लीला रवाना होणार आहेत. दोन दिवस संसदीय कामकाजात सहभाग घेतल्यानंतर ते पुन्हा बारामतीकडे परतणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या या दौऱ्याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले असून, येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विलीनीकरणाच्या चर्चांवरून सुरू झालेला हा राजकीय वाद पुढे कोणत्या दिशेने वळतो आणि त्याचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.