ध्यास विश्वसार्ह बातमीचा

…ते नक्की काय करतात? राज ठाकरेंचा सरकारला सवाल !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील पुणे येथील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील जुन्या लोखंडी पुलाच्या कोसळण्याच्या दुर्घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. रविवारी (15 जून 2025) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला, तर 51 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तर अद्यापही काही जण बेपत्ता आहेत. या संपूर्ण घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. सरकार जर निष्काळजीपणा दाखवणार असेल तर आपणच सतर्क रहायला हवं, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

राज ठाकरेंचे ट्वीट – “काल मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ इंद्रायणी नदीवरचा जुना झालेला लोखंडी पूल कोसळला. त्यात अनेक जणं वाहून गेलेत आणि काही जणं मृत्युमुखी पडलेत. नक्की हानी किती झाली आहे याचा अंदाज आला नाहीये. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली. हा पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली हा प्रश्न आहेच. जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्याने पूल का नाही झाला? प्रत्येक घटनेच्या नंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक प्रतिक्रिया येते की, ‘बचावकार्य वेगाने सुरु आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभं आहे.’ पण मुळात हा प्रसंग का येतो?,” असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.

“सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की काय करतात? त्यांनी दर काही महिन्यांनी किंवा या घटनेपुरतं बोलायचं झालं तर पावसाळयाच्या आधी धोकादायक पूल कुठले आहेत, त्याची तपासणी, त्याची एकतर दुरुस्ती किंवा ते बंद करणे असं काही नियोजन करता येत नाही? बरं प्रशासन करत नसेल तर इतकी वर्ष सत्तेत असलेल्यांना याचं नियोजन करून प्रशासनाकडून कामं करून का घेता येत नाहीत? आणि जर येत नसतील तर मग तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला असेल उपयोग पण राज्याला काय उपयोग?” असे म्हणत राज ठाकरे यांनी सरकारला सुनावले आहे.

तर पर्यटकांना देखील राज ठाकरे यांनी आवाहन केले आहे. “लोकांनी देखील उत्साहाला थोडा आवर घालायला हवा. अशा धोकादायक ठिकाणी जाताना, आपल्या कुटुंबाला घेऊन जाताना थोडं भान ठेवायला हवं. अर्थात म्हणून सरकारची जबाबदारी कमी होते असं नाही. पण सरकार जर निष्काळजीपणा दाखवणार असेल तर आपणच सतर्क रहायला हवं. आत्ता कुठे मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे तर राज्यातल्या बऱ्याच शहरांत पाणी साठणं, रस्त्यांची चाळण होणं, पूल पाडणं अशा घटना सुरु झाल्यात. या सगळ्यात सरकारने आतातरी युद्धपातळीवर काम करून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल हे पहावं,” असे राज ठाकरे म्हंटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!