गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी ब्रीच कॅन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या २८ दिवसांपासून त्यांची प्रकृतीशी झुंज सुरु होती. लता दीदींच्या तब्येत पुन्हा एकदा बिघडल्याने तातडीने डॉक्टरांनी व्हेंटिलेटरवर ठेवले होते. त्यांच्या उपचारासाठी डॉक्टरांचे पथक २४ तास रुग्णालयात हजर होते.
काल त्यांनी उपचारांना प्रतिसाद देण्यास सुरुवात केल्याची माहिती ब्रीच कॅन्डी रुग्णालयाचे डॉ. प्रतित समदानी यांनी दिली होती. तसेच त्याला लता दीदींच्या भगिनी आणि सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनीही दुजोरा दिला होता.
लतादीदी यांनी वयाच्या १३ व्या वर्षी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली.
भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महान पार्श्वगायिका म्हणून, लता मंगेशकर यांनी वयाच्या १३ व्या वर्षी १९४२ मध्ये त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि विविध भारतीय भाषांमध्ये ३०,००० हून अधिक गाणी गायली.
सात दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी ‘अजीब दास्तां है ये’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘नीला अस्मान सो गया’ आणि ‘तेरे लिए’ सारख्या अनेक संस्मरणीय गाण्यांना आपला आवाज दिला आहे.