मुंबई : वृत्तसंस्था
देशातील बदलत्या राजकीय आणि सामाजिक वातावरणावर परखड भाष्य करत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी थेट मतदारांनाच आरसा दाखवला आहे. “जे लोक फक्त धर्म पाहून मतदान करतात, त्यांना माझा एकच प्रश्न आहे – तुम्ही किंवा तुमचे कुटुंब भविष्यात धर्मांतर करणार आहात का? जर करणार नसाल, तर मग आरएसएस आणि भाजप धर्माचा जो मुद्दा मांडत आहेत, तो तुम्हाला खरा का वाटतो?” असा थेट आणि बोचरा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी धर्माच्या नावावर होणाऱ्या ध्रुवीकरणावर तीव्र शब्दांत प्रहार केला. भाजप आणि आरएसएस जाणीवपूर्वक लोकशाहीला हुकूमशाहीकडे नेत असल्याचा आरोप त्यांनी केला. “तुम्ही धर्मांतर करणार नसाल, तर धर्माला धोका आहे हा मुद्दा तुम्हाला पटतोच कसा? हा केवळ जनतेला गुमराह करण्याचा प्रकार आहे,” असे ते म्हणाले. आम्ही आणीबाणी अनुभवली आहे, मात्र सध्याची पिढी एका वेगळ्याच छुप्या हुकूमशाहीकडे ढकलली जात असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
भाजपसोबतच काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवरही आंबेडकरांनी निशाणा साधला. राहुल गांधींचा उल्लेख करत ते म्हणाले, “राहुल गांधी एपस्टीन प्रकरणात आपल्या पंतप्रधानांचे फोटो आहेत का, याबाबत प्रश्न विचारत नाहीत. पेगॅसससारख्या गंभीर मुद्द्यांवरही कोणताही विरोधी पक्षनेता ठामपणे बोलताना दिसत नाही. ईडी आणि सीबीआयचा सेसेमीरा विरोधकांच्या मागे लागलेला असल्यामुळे कोणीही तोंड उघडायला तयार नाही,” अशी टीका त्यांनी केली.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेससोबत जाणार का, या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर यांनी सावध भूमिका मांडली. “मी जर सध्या तोंड उघडले, तर काँग्रेसला देशपातळीवर फटका बसेल आणि त्याचा फायदा भाजपला होईल, म्हणून काही गोष्टी आम्ही सध्या गुलदस्त्यात ठेवत आहोत. मुंबईत काँग्रेससोबत युती करायची की नाही, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच “जोपर्यंत सहयोगी पक्षाला सन्मान दिला जात नाही, तोपर्यंत युतीचा विचार होऊ शकत नाही. आम्ही शिजवलेले तुम्ही आयते खायला बघत असाल, तर ते शक्य नाही,” असे ठणकावून सांगत त्यांनी काँग्रेसलाही इशारा दिला. या वक्तव्यांमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.