मुंबई : वृत्तसंस्था
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त करत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी रविवारी एक धक्कादायक दावा केला. अजित पवार यांच्या विमानात आत्मघातकी हल्लेखोराचा वापर करण्यात आला असावा, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळावर झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला होता. त्या घटनेपासून त्यांच्या मृत्यूवर विविध पातळ्यांवर संशय व्यक्त केला जात असून, आमदार अमोल मिटकरी सातत्याने या प्रकरणात चौकशीची मागणी करत आहेत. रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी या प्रकरणात नवे गंभीर मुद्दे उपस्थित केले.
मिटकरी यांनी सांगितले की, अजित पवार ज्या व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास करत होते, त्या विमानाचे पायलट दोन वेळा बदलण्यात आले होते. संबंधित विमान नादुरुस्त होते आणि त्यावर मागील एक वर्षापासून बंदी होती, असे असतानाही 28 जानेवारी रोजी तेच विमान अजित पवारांसाठी वापरण्यात आले, असा दावा त्यांनी केला.
तसेच, व्हीएसआर कंपनीने डिसेंबर महिन्यात आपल्या प्रत्येक वैमानिकाचा प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा विमा उतरवला होता. “इतक्या मोठ्या रकमेचा विमा का उतरवण्यात आला? ऐनवेळी बदलण्यात आलेल्या पायलटला हिप्नोटाईज करण्यात आले होते का किंवा त्याला आमिष दाखवण्यात आले होते का?” असा प्रश्न मिटकरी यांनी उपस्थित केला. काही देशांमध्ये हिप्नोटाईज करून आत्मघातकी हल्लेखोरांचा वापर करण्यात आल्याची उदाहरणे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या अपघातात पायलटने ‘मे डे’चा कॉल का दिला नाही, यावरही त्यांनी संशय व्यक्त केला. टेकऑफनंतर काही वेळातच पुणे गाठता आले असते, मात्र तसे प्रयत्न झाले नाहीत, यामागे काहीतरी गंभीर कारण असू शकते, असा दावा त्यांनी केला. आपल्या संशयाच्या समर्थनार्थ मिटकरी यांनी राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणाचा तसेच मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांचा दाखला दिला. “अजमल कसाबसारख्या हल्लेखोरांचा वापर करण्यात आला होता, तसाच प्रकार येथे घडला का, याची सखोल चौकशी झाली पाहिजे,” असे ते म्हणाले. या संपूर्ण प्रकरणी आपण मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चौकशीची मागणी करणार असल्याचेही अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आमदार रोहित पवार यांच्या आगामी पत्रकार परिषदेवर भाष्य करताना मिटकरी म्हणाले की, “कुटुंबातील सदस्य म्हणून रोहित पवार जे काही पुरावे मांडतील, ते अत्यंत महत्त्वाचे असतील. त्यांच्या पत्रकार परिषदेवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे.”