कोल्हापूर : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून काही लोकांनी महापुरुषांवर वादग्रस्त विधान करीत असून बॉलिवूड अभिनेता कमाल आर खानने विकिपीडियावरील माहितीचा आधार घेत छत्रपती संभाजी महाराजांबाबत एक वादग्रस्त पोस्ट केली. ज्यात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल चुकीच्या आणि आक्षेपार्ह गोष्टी लिहिलेल्या होत्या. ज्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणावर आता खासदार शाहू महाराज यांनी देखील भाष्य केले आहे.
विकिपीडिया म्हणजे इतिहास नाही, विकिपीडियामध्ये ज्याला जे वाटते ते टाकत आहे, पण ज्यांनी कोणी चुकीची माहिती टाकली त्याचा निषेध केला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने त्यासंदर्भात ॲक्शन घेतली पण ती ॲक्शन कमी असल्याचे खासदार शाहू महाराज यांनी म्हटले आहे. तसेच, महाराष्ट्र सरकारने अशा प्रकरणांमध्ये त्वरित पावले उचलावीत आणि ऐतिहासिक महापुरुषांविषयी चुकीची माहिती पसरवणाऱ्या कोणालाही पाठीशी घालू नये, असे ते म्हणाले.
पुढे शाहू महाराज म्हणाले की, आज शिवाजी महाराजांची 395 वी जयंती आहे. पाच वर्षांनी 400 वर्षे पूर्ण होतील. शिवाजी महाराजांचे कार्य निश्चितच देशातील सर्वांना मार्गदर्शक होईल.आग्रामध्ये शिवजयंती साजरा होते याचा आनंद आहे. शिवाजी महाराज आग्र्यातून परत कसे आले हे कोणालाच माहित नाही. या संदर्भात संशोधन होण्याची गरज आहे. राहुल सोलापूरकर यांनी चुकीचं वक्तव्य केले. छत्रपती शिवाजी महाराज हे आग्राहून निसटले हे निश्चित पण औरंगजेबाला पैसे देऊन निसटले ही गोष्ट चुकीची असल्याचे म्हणत त्यांनी राहुल सोलापूरकर यांना फटकारले.
राज्य सरकारने सर्वच पुतळ्यांची दखल घेतली पाहिजे
मालवण येथे संभाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना घडली असून, शाहू महाराज छत्रपती यांनी याबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली. “राज्य सरकारने सर्वच पुतळ्यांची दखल घेतली पाहिजे. भविष्यात कोणताही पुतळा उभारण्याआधी संपूर्ण अभ्यास करून योग्य ती माहिती घ्यावी आणि त्यानंतरच पुतळा उभारला जावा. पुतळे बांधत असताना परवानगीप्रमाणे पुतळे बांधत आहेत का हे तपासले पाहिजे, असेही आवाहनही शाहू महाराज यांनी केली.
देवेंद्र फडणवीसांचे आदेश
विकीपीडियावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या आक्षेपार्ह्य मजकूराबाबत बोलाताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “छत्रपती संभाजी महाराजांबाबत विकिपीडियावर लिहिलेल्या वादग्रस्त गोष्टींचा आम्ही निषेध करतो. राज्य सरकारने सायबर विभागाचे आयजी यशस्वी यादव यांच्याशी संपर्क केला आहे. त्यांनी विकिपीडियाशी बोलून संभाजी महाराजांबद्दलची वादग्रस्त माहिती हटवून योग्य माहिती प्रसारित करण्याचे आदेश दिले आहेत.”