मुंबई वृत्तसंस्था : नव्या वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असताना, 2026 मध्ये लागू होणाऱ्या महत्त्वाच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसू शकतो. संकल्प, प्लॅनिंग आणि नव्या कामांच्या यादीसोबतच आर्थिक नियमांतील बदल जाणून घेणेही तितकेच गरजेचे ठरणार आहे. आधार-पॅन लिंकिंगपासून ते बँक व्याजदर, एलपीजी दर आणि क्रेडिट कार्ड नियमांपर्यंत अनेक बदल 1 जानेवारीपासून लागू होणार आहेत.
आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 असून, ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते. यामुळे बँक व्यवहार, आयकर रिटर्न आणि आर्थिक व्यवहारांमध्ये मोठ्या अडचणी येण्याची शक्यता आहे.
नव्या वर्षात अनेक बँकांकडून व्याजदरात बदलाचे संकेत देण्यात आले आहेत. विशेषतः मुदत ठेवी (FD) आणि कर्जाच्या व्याजदरात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. हे बदल सामान्य ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार की नुकसानकारक, हे 1 जानेवारीनंतर स्पष्ट होईल.
याशिवाय, 1 जानेवारीपासून एलपीजी तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये बदल होणार आहेत. विमान इंधनाच्या दरातही सुधारणा होणार असल्याने हवाई प्रवास स्वस्त होणार की महाग, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठीही नव्या वर्षात नियमांमध्ये बदल अपेक्षित आहेत. बँकिंग व्यवस्थेतील या बदलांचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार असल्याने, नव्या वर्षात पाऊल टाकण्यापूर्वी हे नियम जाणून घेणे अत्यावश्यक ठरणार आहे.